ताज्या बातम्यारायगड
पेण- वडखळमध्ये वित्तीय समावेशनाचा उत्सव; 2 हजारांहून अधिक नागरिकांना बँकिंगचा लाभ

रायगड : पेण व वडखळ येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी विशेष वित्तीय समावेशन शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिरांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक विवेक दीप, प्रादेशिक निर्देशक (मुंबई) सुमन रे, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक जी. के. सुधाकर राव, पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य महाप्रबंधक दीपक श्रीवास्तव आणि ॲक्सिस बँकेचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट प्रदीप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिरात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग प्रतिनिधी यांना खाते उघडणी, पुनः-केवायसी (Re-KYC), पीएम जनधन योजना, सामाजिक सुरक्षा विमा योजना, मुद्रा कर्ज योजना, डिजिटल व्यवहाराविषयी मार्गदर्शन तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
प्रमुख पाहुणे विवेक दीप यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वित्तीय समावेशन ही सर्वांगीण आर्थिक विकासाची किल्ली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने बँकिंग प्रणालीशी जोडले जाऊन तिच्या सुविधांचा लाभ घ्यावा.”
तर महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी डिजिटल व्यवहारातील सुरक्षा उपायांचे महत्त्व अधोरेखित केले व वित्तीय साक्षरतेसाठी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याचे आवाहन केले.
पेणमधील कार्यक्रमात विविध बँकांचे 12 स्टॉल तर वडखळमधील कार्यक्रमात 8 बँकांचे स्टॉल लावण्यात आले. दोन्ही ठिकाणी शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 2 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी तत्काळ आवश्यक अर्ज व प्रक्रिया पूर्ण करून योजनांचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे यांनी केले. वडखळमधील कार्यक्रमाच्या यशासाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.