ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

पूरस्थितीची शक्यता, कोकणातील यंत्रणा सज्ज — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

शिंदे यांनी सांगितले की संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने २४x७ नियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. सखल भागांत पाणी उपसा पंप, धोकादायक इमारतींवर सतत लक्ष, तसेच वीज आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून भातसा धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

नागरिकांनी पूरप्रवण व धोकादायक भागात जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये आणि कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू असून विविध शाळांची वर्गखोल्या त्यासाठी तयारीत ठेवण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील मोखडा भागातील नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार आहेत. बदलापूर येथे एका व्यक्तीचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची एकच दुर्घटना घडली असून अन्यत्र मोठे नुकसान झालेले नाही. मासेमारीसाठी गेलेल्या सर्व बोटी सुखरूप परत आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मराठवाड्यातही पालकमंत्री आणि प्रशासन सतर्क असून शेतकऱ्यांना मदत पुरवली जात आहे. शेतकरी संकटात असताना विरोधक मात्र राजकारण करत असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
या बैठकीला कोकण आयुक्त, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, एनडीआरएफ, टीडीआरएफ, एमएसईबी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Back to top button