“पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या पूरस्थितीच्या संकटात राज्य सरकार त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाईल,” असे शिंदे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केले.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “शर्टाची इस्त्री मोडू न देणारा, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसणारा, फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री मी नाही,” असा टोला त्यांनी लगावला. मदत करणारा शिवसैनिक संकटकाळात जनतेसोबत उभा राहतो, असे सांगत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहोचेल, असे आश्वासनही दिले.
पूरग्रस्तांसाठी शिवसेना पुढाकार घेणार असून त्यांच्या मुलामुलींची लग्नं लावून देण्यापर्यंत मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “दानत्व लागते ते शिंदेमध्येच आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही; माझे शिवसैनिक हेच माझे खरे ऐश्वर्य आहे,” असे शिंदे म्हणाले.
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. “सावरकरांवर टीका करणाऱ्यांना बाळासाहेब असते तर मिरच्यांची धुरी दिली असती,” असा जळजळीत हल्ला त्यांनी केला. महाविकास आघाडीवरही हल्लाबोल करत “गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख आहेत” असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
केंद्र सरकारच्या मदतीचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “मोदींनी महाराष्ट्राला 46 हजार कोटी रुपये दिले, शेतकऱ्यांचा टॅक्स माफ केला, राममंदिराचे स्वप्न पूर्ण केले.” मुंबई मराठी माणसाचीच राहणार असल्याची ग्वाही देत गिरणी कामगार, एसआरए प्रकल्प आणि गुंतवणुकीसंबंधी महत्त्वाचे आश्वासनही त्यांनी दिले.
शेवटी कार्यकर्त्यांना उद्देशून शिंदे म्हणाले, “लोकसभा, विधानसभा आपण जिंकल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा. प्रत्येक शिवसैनिकाने एकनाथ शिंदे बनून काम करावे.”




