ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
पाठ्यपुस्तकातून प्रत्यक्ष अनुभवाकडे; रायगडात ‘हिंद-दी-चादर’चा ऐतिहासिक ‘विक्रमी सूर’ घुमला
३५०व्या शहीदी समागमानिमित्त ३५४८ शाळांत एकाच वेळी सामूहिक गायन; ४.९४ लाख विद्यार्थी सहभागी, ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पाठ्यपुस्तकातील काही परिच्छेदांपुरते मर्यादित राहिलेले श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे जीवनकार्य सोमवारी (ता. २३) रायगड जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवाच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले. त्यांच्या ३५०व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ५४८ शाळांमध्ये एकाच वेळी ‘हिंद-दी-चादर’ हे भक्तीगीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. सुमारे ४ लाख ९४ हजार ४३५ विद्यार्थी आणि १९ हजार ७१६ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले. या व्यापक सहभागाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून घेण्यात आली असून जागतिक विक्रमांच्या यादीत त्याची नोंद झाली आहे.
मात्र, या भव्य आकडेवारीपलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी इतिहास जिवंत करणारा ठरला का, की तो केवळ एकदिवसीय औपचारिकता राहिला? यामध्ये सातत्य असायला पाहिजे.

अलिबाग शहरातील जनरल अरूणकुमार वैद्य हायस्कूल येथे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले आणि त्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. खोपोलीतील शाळांमध्ये सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत विद्यार्थ्यांनी एकसुरात सादर करत वातावरण भारावून टाकले. कर्जत तालुक्यातील आश्रमशाळेत विद्यार्थिनींनी ‘अखंड भारत’चा मानवी नकाशा साकारत आणि तिरंगी टोप्या-फुग्यांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचे प्रतीक उभे करत कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. या सर्व उपक्रमांतून इतिहास केवळ पाठांतरापुरता न राहता अनुभवात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसून आला.
तथापि, तज्ज्ञांच्या मते अशा उपक्रमांचा प्रभाव दीर्घकालीन ठरण्यासाठी सातत्याची गरज असते. एकदिवसीय सामूहिक गायन विद्यार्थ्यांमध्ये तात्पुरती प्रेरणा निर्माण करू शकते; परंतु त्या प्रेरणेचे विचारांमध्ये रूपांतर व्हावे यासाठी अभ्यासक्रमातील सखोल चर्चा, प्रकल्पाधारित शिक्षण, मूल्यशिक्षण आणि सातत्यपूर्ण उपक्रमांची जोड आवश्यक असते. रायगडातील या उपक्रमाने इतिहासाला जिवंत स्वरूप देण्याचा प्रयत्न निश्चितच केला आहे; मात्र हा उत्साह आणि प्रेरणा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कितपत टिकून राहते, याकडे आता लक्ष लागून आहे.




