ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
पांढऱ्या अॅप्रनला मिळाली नवीन ओळख; २६ आरोग्य सेविका बनल्या सहाय्यक, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील २६ महिला आरोग्यसेविकांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे आरोग्य सहाय्यक (महिला) वर्ग-३, श्रेणी-२ (तांत्रिक) पदावर पदोन्नती देण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारी (ता. १०) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत पात्र महिला आरोग्यसेविकांची पदोन्नती समुपदेशन पद्धतीने करण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन दिव्यांग महिला आरोग्यसेविकांचाही समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सर्वांना पदोन्नती आदेश प्रदान करण्यात आले.
समुपदेशनातून पार पडलेल्या या प्रक्रियेबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. या पदोन्नतीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या वेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी नवनियुक्त आरोग्य सहाय्यकांचे अभिनंदन करून नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.




