क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
नाशिकचा फटका, पुण्याची अचूक गोलंदाजी; एमसीएत प्रतिस्पर्ध्यांची घालमेल! शतक, षटकार आणि सहा बळी; वरिष्ठ गटात रंगली विजयी कहाणी!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन आयोजित पुरुषांच्या दोन दिवसीय वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत क्लब ऑफ महाराष्ट्र (नाशिक), सेंट्रल डिफेन्स अकॅडमी (पुणे) आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी आपापल्या सामन्यांत विजय संपादन केला.
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या सामन्यात क्लब ऑफ महाराष्ट्रने रायगडवर ५ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना रायगडचा पहिला डाव १२० धावांत आटोपला असून सागर मुळे यांनी ५३ धावांची खेळी केली. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून अंकित विश्वकर्मा व वैभव गोसावी यांनी प्रत्येकी ४ गडी घेतले. प्रत्युत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्रने पहिल्या डावात २२८ धावा केल्या. शुभम कटारे यांनी ५३ धावा केल्या, तर रायगडकडून अमित कदम व कौस्तुभ म्हात्रे यांनी प्रत्येकी ३, अभिषेक खातू यांनी २ गडी घेतले. दुसऱ्या डावात रायगडने १७९ धावांवर डाव घोषित करत ६९ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य क्लब ऑफ महाराष्ट्रने ५ गडी गमावत पूर्ण केले.
बेलापूर येथील सिडको मैदानावर झालेल्या सेंट्रल झोन विरुद्ध सेंट्रल डिफेन्स अकॅडमी, पुणे सामन्यात सेंट्रल डिफेन्स अकॅडमीने ९० धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात त्यांनी ८ बाद ३४८ धावांवर डाव घोषित केला. संकीर्ण पाटील यांनी १०८ धावांची शतकी खेळी केली. सेंट्रल झोनचा पहिला डाव २७१ धावांवर संपला. पीयूष अष्टेकर (५१) व सचिन लवेरा (५८) यांनी अर्धशतके झळकावली. सेंट्रल डिफेन्स अकॅडमीकडून कुनाल त्रिपाठी यांनी ४ व पीयूष कनोजिया यांनी ३ गडी घेतले. दुसऱ्या डावात सेंट्रल डिफेन्स अकॅडमीने १५४ धावांवर डाव घोषित केला. श्रेयस मिटकरी यांनी ९१ धावा केल्या. २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट्रल झोनचा डाव १४१ धावांवर आटोपला. कुनाल त्रिपाठी यांनी ६ तर शिवम दिवेकर यांनी ४ गडी घेत निर्णायक कामगिरी बजावली.
गव्हाण-उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या सामन्यात नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने वायएमसीए संघावर ८ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने चुरशीचे होत असून पुढील फेरीसाठी संघांमध्ये स्पर्धा अधिक रंगतदार बनली आहे.




