ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबई

नागपूर चिंतन शिबिरातून ‘नागपूर डिक्लेरेशन’ जाहीर

अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक घोषणा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथे पार पडलेल्या चिंतन शिबिरातून ‘नागपूर डिक्लेरेशन’ मांडण्यात आले. “संध्याकाळपर्यंत समित्यांनी मिळून तयार केलेला आराखडा नागपूर डिक्लेरेशन म्हणून सादर करण्यात आला,” असे या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक व पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले. या घोषणेमुळे शिबिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
या शिबिरादरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध समित्यांमार्फत सामाजिक, राजकीय व आर्थिक विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रत्येक समितीने आपापले निरीक्षण व निष्कर्ष सादर करत पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी दिशा व मार्गदर्शन दिले.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रगतिकारक तत्त्वज्ञानाशी निगडित पक्षाच्या मूलभूत विचारधारेस या शिबिरात नव्याने उजाळा देण्यात आला, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. आत्मपरीक्षणापुरते मर्यादित न राहता जनतेच्या अपेक्षा व आकांक्षा लक्षात घेऊन पक्षाच्या विचारसरणीस व ध्येयधोरणांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाची विचारसरणी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या रणनीतींसोबतच समकालीन सामाजिक व राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी, संघटनात्मक मजबुतीकरण, कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण, तसेच भविष्यातील निवडणुकांसाठी ठोस व लोकाभिमुख तयारी या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन करण्यात आले.
या शिबिराचे नेतृत्व अजितदादांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नव्या जोमाने आणि नव्या दृष्टिकोनासह आगामी काळात जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले.
‘नागपूर डिक्लेरेशन’चे ठळक मुद्दे :
पक्षाची विचारसरणी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
समकालीन सामाजिक व राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची रणनीती
संघटनात्मक मजबुतीकरण व कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण
भविष्यातील निवडणुकांसाठी ठोस व लोकाभिमुख तयारी
जनतेच्या अपेक्षा व आकांक्षा लक्षात घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणांना नवसंजीवनी
शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रगतिकारक तत्त्वज्ञानाला नव्याने उजाळा

Related Articles

Back to top button