ताज्या बातम्यारायगड

नवरात्र उत्सवानिमित्त रायगड डाक विभागाचा उपक्रम : सुकन्या समृद्धीद्वारे स्त्री सबलीकरणाचा अनोखा पायंडा

गरीब व आदिवासी मुलींसाठी ‘सुकन्या खाते दत्तक’ उपक्रमास समाजसेवकांना आवाहन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग :  नवरात्र उत्सव हा स्त्रीशक्तीचा गौरव करणारा पर्व. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या देवतांच्या रूपातून समाजात स्त्रीशक्तीचे महत्त्व मान्य केले जाते. तरीही स्त्री सबलीकरणाच्या बाबतीत समाज अजूनही डळमळीत असल्याचे चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रायगड डाक विभागाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ अधिक तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

सुकन्या समृद्धी योजना ही ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींसाठी असून, पालक किंवा कायदेशीर पालक योजनेचा लाभ घेऊ शकतात. रु. २५० पासून खाते सुरू करता येते आणि १५ वर्षे नियमित बचतीनंतर २१ व्या वर्षी मुलीला शिक्षण व लग्नासाठी भक्कम आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेत इतर कोणत्याही कारणासाठी खाते बंद करता येत नसल्याने मुलीच्या भविष्याचा ठोस पाया तयार होतो.

रायगड विभाग डाक अधीक्षक श्री. सुनील थळकर यांनी या योजनेच्या प्रसारासाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अभिनव संकल्पना मांडली आहे. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी, समाजसेवकांनी व संस्थांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी ‘सुकन्या समृद्धी खाते दत्तक’ घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

थळकर यांनी सांगितले की, “गरीब, आदिवासी आणि वंचित मुलींच्या नावाने दानशूरांनी खाते उघडून दिल्यास त्यांच्या शिक्षणाचा व विवाहाचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागेल. हीच खरी सामाजिक बांधिलकी ठरेल.”

ग्रामीण भागातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाजसेवक, सामाजिक संस्था व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 


Related Articles

Back to top button