ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
ध्वजवंदन मिळालं, पण सत्ता अजून दूरच! भरत गोगावलेंची सुप्त इच्छा पूर्ण, तटकरे-शिंदे-फडणवीसांच्या राजकीय खेळात रायगडचं भवितव्य टांगणीला

‘फडशा’
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग | रायगडच्या राजकीय रणभूमीवर अखेर एक मोठा “ध्वज” रोवला गेला आहे! गेल्या अनेक वर्षांपासून मनात साचून राहिलेली मंत्री भरत गोगावले यांची सुप्त इच्छा बुधवारी (21 जानेवारी) पूर्ण झाली आहे. 26 जानेवारी 2026 रोजी, देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी, रायगड जिल्हा मुख्यालयात गोगावलेंच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आजच्या परिपत्रकाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि रायगडच्या राजकारणात नवा वादळाचा इशारा दिला आहे. पण या “सन्मानामागे” एक मोठा राजकीय धक्का दडलेला आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची रायगडमध्ये ध्वजवंदनाची संधी यंदा हुकली आहे. तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला थेट आव्हान देणारा हा निर्णय मानला जात असून, त्यामुळे जिल्ह्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने थेट ध्वजवंदनाचा “राजकीय संकेत” दिला आहे.

नाशिकमध्ये गिरीश महाजन, तर रायगडमध्ये भरत गोगावले असा स्पष्ट संदेश सत्तेच्या केंद्रातून बाहेर गेला आहे.
तीन-चार टर्म निवडणुका जिंकल्या, पण त्या विजयापेक्षा 26 जानेवारीचा हा क्षण अधिक मोठा वाटतोय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गोगावलेंच्या समर्थकांमध्ये एकच चर्चा
“आज ध्वजवंदन, उद्या पालकमंत्री!”
त्यांच्या गोटात असा विश्वास घर करून बसला आहे की हा सन्मान म्हणजे लवकरच पालकमंत्रीपदाच्या खुर्चीकडे जाणार पहिल ठोस पाऊल.
आतापर्यंत खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गोगावलेंच्या राजकीय मनसुबांना अडथळे येत होते, अशी उघड चर्चा आहे. पण आता चित्र बदलत असल्याचं दिसतंय. मात्र खरा प्रश्न अजूनही तसाच आहे.

सुनील तटकरे पुढची चाल काय खेळणार?
राजकीय डावपेचातून गोगावले स्वतःचा मार्ग कसा काढणार? ध्वजवंदन हा केवळ सन्मान नाही, तो सत्तेचा इशारा आहे. रायगडच्या राजकारणात हा ध्वज कुठे रोवला जाणार फक्त व्यासपीठावर, की थेट पालकमंत्रीपदाच्या खुर्चीवर हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत, रायगडचं राजकीय रण अजून पेटतच राहणार…




