ताज्या बातम्यामहाराष्ट्र
धरण क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यातील लघु सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेसोबतच धरण परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आता ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी तलाव स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील बोलत होते. चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला.
मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रति घनमीटर ₹३५.७५ इतका निधी, कमाल ₹१५,००० पर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाच्या यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.