ताज्या बातम्यादेश विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

‘द बार्ड्स ऑफ बॉलिवूड’ वादात आर्यन खानला दिलासा; वानखेडेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली


सत्यमेव जयते न्यूज कॉम कॉम

मुंबई  |
माजी एनसीबी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्या ‘द बार्ड्स ऑफ बॉलिवूड’ या नेटफ्लिक्स वेब सीरिजविरोधात वानखेडे यांनी दाखल केलेला दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
या वेब सीरिजमधील एका पात्राचे चित्रण आपल्याशी साधर्म्य साधणारे असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला होता. या चित्रणामुळे आपली प्रतिमा मलिन होत असून तपास यंत्रणांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. तसेच, वादग्रस्त दृश्ये हटवून दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली होती. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला दान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी तांत्रिक मुद्द्यांवर भर देत स्पष्ट केले की, समीर वानखेडे हे मुंबईचे रहिवासी आहेत आणि संबंधित वेब सीरिजची निर्मिती करणारी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ही कंपनीदेखील मुंबईस्थित आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होऊ शकत नाही.
न्यायालयाने वानखेडे यांची याचिका फेटाळताना त्यांना योग्य न्यायालयात, म्हणजेच मुंबईत, दाद मागण्याची मुभा दिली आहे.
आर्यन खान–वानखेडे वादाचा मागोवा:
२०२१ मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती. मात्र, नंतर पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आता आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिल्याच वेब सीरिजवरून हा नवा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्यन खान आणि नेटफ्लिक्सला मोठा दिलासा मिळाला असून, समीर वानखेडे मुंबई न्यायालयात याचिका दाखल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button