ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
दुबईत तणावाच्या पार्श्वभूमीवर पालीतील विद्यार्थी अडकला! इराण-अमेरिका संघर्षानंतर परिस्थिती गंभीर; जिल्हा प्रशासन सतर्क

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड | पाली-सुधागड
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव तीव्र झाला असून इराणने प्रत्युत्तरादाखल दुबईतील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पाली पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी राजेश मपारा यांचा मुलगा उत्कर्ष राजेश मपारा हा दुबई येथे शिक्षणासाठी गेला असून सध्या तो तेथे अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
उत्कर्ष मपारा हा दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटी परिसरातील एसपी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही भागात हालचालींवर निर्बंध लागू करण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच वडील राजेश मपारा यांनी आपल्या मुलाची सविस्तर माहिती पाली पोलीस स्टेशन येथे सादर केली असून प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजेश मपारा हे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य तथा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
उत्कर्ष सोबत आम्ही मोबाईलच्या माध्यमातून सातत्याने संपर्कामध्ये आहोत. पण तेथील परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असल्याने अधिक चिंता वाढली आहे. तो ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजमध्ये मुंबई पुण्यातील देखील विद्यार्थी शिकत आहेत, असे राजेश मपारा यांनी सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम शी बोलताना सांगितले.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परराष्ट्र मंत्रालयामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा किती सज्ज आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांची नोंद, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, तातडीची स्थलांतर योजना याबाबत ठोस मार्गदर्शक तत्त्वे स्थानिक प्रशासनाकडे आहेत का? की प्रत्येक वेळी पालकांनाच धावपळ करावी लागणार?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कुटुंबीयांचा नाही, तर शासनाच्या जबाबदारीचाही आहे याची जाणीव संबंधित यंत्रणांनी ठेवणे गरजेचे आहे.
……
दुबईमध्ये शिक्षणानिमित्त अथवा पर्यटन निमित्त कोणी अडकून पडले असेल तर त्यांना सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्य सरकारच्या संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. संबंधित पालकांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने माहिती कळवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.
……




