ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

तीन वर्षे सलग यश : महाआवास अभियानात रायगड जिल्हा परिषदेचा विभागीय गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  | 
महाआवास अभियानांतर्गत सलग तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी करत रायगड जिल्हा परिषदेने कोकण विभागात आपला डंका वाजवला आहे. विविध आवास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे रायगड जिल्हा परिषदेला विभागस्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
नवी मुंबई येथील सिडको भवन येथे बुधवारी (ता.२५) आयोजित कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला.
राज्यात गुणवत्ता वाढीसाठी सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायगड जिल्हा परिषदेला सलग तीन वर्षे विविध गटांत उल्लेखनीय यश मिळाले आहे.
सन २०२१-२२ मध्ये राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद विभागात तृतीय क्रमांक, सन २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तृतीय क्रमांक, तर सन २०२३-२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पुन्हा तृतीय क्रमांक मिळवित सातत्य राखले. याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजना २०२३-२४ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत रायगडने यंदा अधिक उंच झेप घेतली आहे.
विशेष म्हणजे, राज्य पुरस्कृत आवास योजना २०२२-२३ अंतर्गत सर्वोत्कृष्ट पंचायत समिती विभागात पनवेल पंचायत समितीला प्रथम क्रमांक मिळाल्याने रायगड जिल्ह्याच्या कामगिरीत आणखी भर पडली आहे.
महाआवास अभियानाच्या प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेत उद्दिष्टपूर्तीमुळे रायगड जिल्हा परिषद राज्याच्या आवास योजनांमध्ये सातत्याने अग्रस्थानी राहत आहे. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्यात प्रशासनाने दाखविलेली कार्यक्षमता या गौरवामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
सलग तीन वर्षांच्या या यशामुळे कोकण विभागात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाची भक्कम छाप उमटली असून, आगामी काळातही हीच गुणवत्ता कायम राखण्याचा निर्धार प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button