ताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड

तटकरेंनी टाकलेला डाव रायगडच्या राजकारणाचा गेम चेंजर!

‘ऑपरेशन लोटस’नंतर ‘ऑपरेशन क्लीन स्वीप’ महाविकास आघाडीला धोबीपछाड


आविष्कार देसाई

रायगड : जिल्ह्यातील काँग्रेसची घसरलेली पकड आणि उद्धव ठाकरे गटाचा ढासळलेला गड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी “ऑपरेशन क्लीन स्वीप” सुरू केल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. मधुकर ठाकूर यांचे पुत्र, ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचा पक्षप्रवेश हा त्याचाच भाग मानला जात आहे.

भाजपने देशभरात “ऑपरेशन लोटस” राबवत अनेक राज्यांतील प्रमुख नेत्यांना आपल्याकडे वळवले, त्याच पद्धतीने रायगडमध्ये आता खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या माध्यमातून “ऑपरेशन क्लीन स्वीप” सुरू केल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांचं अस्तित्व खिळखिळं करण्यामध्ये तटकरे यांना यश मिळालं असून, त्यांनी आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला आपल्याकडे वळवून मोठा राजकीय डाव टाकला आहे.

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. मधुकर ठाकूर यांचे पुत्र, ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर, यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून, हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय रणांगण तापणार असल्याचे स्पष्ट होते.

ऍडव्होकेट ठाकूर हे पूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी 2009 मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. अलिबाग नगर परिषदेमध्ये काँग्रेसकडून एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते, त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. वकिली क्षेत्रात त्यांनी यश मिळवलं असलं, तरी राजकारणात मात्र फारसं यश पदरात पाडता आलं नाही.

त्यांच्याकडे असलेला राजकीय वारसा, अनुभव आणि कॅलिबर पाहता खासदार तटकरे यांनी त्यांच्यातील राजकीय संभाव्यता ओळखली आहे. हा पक्षप्रवेश केवळ एका नेत्याच्या प्रवेशापुरता मर्यादित न राहता, रायगडमधील भावी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे.

आज रायगडमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्वच पातळ्यांवर काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे. पक्षाचे संघटन कमजोर झाले असून, वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या दुर्लक्षामुळे गळती थांबत नाही. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील राजकारणात अजूनही मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांचा त्यांनी 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फक्कड पराभव केला होता. त्यानंतर शिवसेनेला ही कमालीची मरगळ आलेली आहे.

दरम्यान, फक्त काँग्रेसच नाही तर शेतकरी कामगार पक्षाचाही प्रभाव आता ओसरत चालला आहे. पूर्वी रायगड जिल्ह्यात शेका पक्षाचे 12-13 आमदार असायचे, मात्र आज स्थिती पूर्ण बदलली आहे. विधान परिषदेमध्ये गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ आमदार असलेले जयंत पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिकिटावर पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव घडवून आणणाऱ्या ‘अदृश्य हातां’विषयी चर्चांना उधाण आले असले तरी, यामागचं नक्की गणित अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

खासदार सुनील तटकरे यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय गरज ओळखून इतर पक्षातील नेत्यांशी संधान बांधत सत्ता टिकवली आणि वाढवली हे नाकारता येणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये महायुतीचा पायाभूत आधार मजबूत होतोय, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी साठी हे नक्कीच परवडणारे नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button