ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
डॉनगिरीच्या संघर्षात ‘लेडी डॉन’ची एन्ट्री? बेरोजगार तरुणांसाठी शेकाप थेट मैदानात

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : डॉनगिरीच्या घोषणांनी आणि अहंकाराच्या युद्धाने जिल्ह्याचं राजकारण पेटलेलं असताना, याच गदारोळात शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी थेट मैदानात उडी मारली आहे का? असा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. गाण्यांवरची डॉनगिरी, व्यासपीठांवरील आव्हानं आणि शब्दांची लढाई सुरू असताना, त्यांनी मात्र बेरोजगार तरुणांचा प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरून संघर्षाची दिशा बदलली. त्यामुळे ही उडी केवळ राजकीय प्रतिक्रिया ठरते की डॉनगिरीच्या दिखाव्याला दिलेलं ठोस प्रत्युत्तर आहे, की मग एका नव्या आक्रमक ‘लेडीज डॉन’ प्रतिमेकडे झुकणारी राजकीय खेळी हाच आज जिल्ह्यातला खरा चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

निवडणुकीपूर्वी तरुणांच्या हाताला काम देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात आलं. स्वप्नं दाखवली गेली, आश्वासनं दिली गेली. मात्र निवडणूक संपताच हेच तरुण बेरोजगार झाले. रायगड जिल्ह्यातील 693 युवक आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. प्रश्न जिवंत आहेत, वेदना ताज्या आहेत पण सत्ताधाऱ्यांकडून मात्र ठोस उपाययोजना नाही.
दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात ‘डॉन’ हा शब्द चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मुरुड महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांचा “मैं हूँ डॉन”वरचा नाच, त्यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचं “मीच डॉन” असल्याचं जाहीर आव्हान या सगळ्यामुळे जिल्ह्यात काही काळ राजकीय अहंकाराचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. मात्र या साऱ्या गदारोळात बेरोजगार तरुणांचा प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित राहिला.
याच पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत थेट सवाल उभा केला. “डॉन म्हणणारे आज कुठे गेले? बेरोजगार युवकांचे प्रश्न तसेच आहेत,” असे स्पष्ट आणि बोचरे शब्द वापरत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. डॉनगिरी ही स्टेजवर दिसत नाही, ती संकटात असलेल्या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्यात दिसते, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
चित्रलेखा पाटील यांनी स्वतःला कधीही ‘डॉन’ म्हणवून घेतलेलं नाही. मात्र बेरोजगारांचा प्रश्न हातात घेणं, रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारणं या कृतींमुळेच त्यांच्याभोवती एक विशिष्ट प्रतिमा आकार घेत असल्याचं चित्र दिसत आहे.




