ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

 ‘डबल ढोलकी’वर शिंदेंचा टोला; उद्धव-राज ठाकरेंच्या ‘मनोमिलना’वरही टीका


सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम 
यवतमाळ : विरोधकांनी यवतमाळमध्ये केलेल्या ‘ढोलकी बजा’ आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. “तो नेता डबल ढोलकी आहे. एका बाजूने काँग्रेसची, दुसऱ्या बाजूने हिंदुत्वाची ढोलकी वाजवतो, पण दोन्ही बाजूंनी आवाज निघत नाही,” असा जहरी टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता लगावला. ‘कालीराम का फट गया ढोल, हो गया उसका डब्बा गोल’ या गाण्याचा उल्लेख करत, “मतदार त्यांचा डब्बा गोल केल्याशिवाय राहणार नाही,” असेही त्यांनी व्यंगात्मक भाष्य केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही त्यांनी चिमटा काढत म्हटले, “दिवाळीला काही जणांची ‘मनोमिलनाची नाटके’ झाली, पण लोक त्यांच्या दिवाळ काढतील.” मतदार सुज्ञ आहे आणि सत्तेसाठी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे हे यवतमाळ येथील शिवसेनेच्या ‘संकल्प शिबिरा’त दृकश्राव्य माध्यमातून बोलत होते. पुण्यातील खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकले नाही.
‘बळीराजाची जबाबदारी माझी आहे’
शिंदे म्हणाले, “राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. सत्ता-पदं येतात-जाता, पण बळीराजाचा संसार सावरणे महत्त्वाचे.”
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून केंद्र सरकारही पाठीशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “बळीराजाला आपण कधीच वाऱ्यावर सोडले नाही आणि सोडणारही नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.
‘घरात बसून फोक्या मारणारा मुख्यमंत्री लोकांना नको’
“रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना. लोकांना रस्त्यावर काम करणारा शिवसैनिकच आवडतो. घरात बसून फोक्या (थापा) मारणारा मुख्यमंत्री लोकांना आवडला नाही,” असा स्पष्ट प्रहार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला.
शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे आहे.” त्यांनी यवतमाळमध्ये जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून राबवलेल्या जलयुक्त शिवार आणि इतर योजनांचा उल्लेख करत विकासकामांचा आढावा दिला.
‘उद्धव गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवसेनेत येत आहेत’
“राज्यात मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवसेनेत येत आहेत. लोक त्यांच्या भंपकपणाला कंटाळले आहेत,” असे शिंदे म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
‘मी आजही कार्यकर्ता आहे’
“मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. काहीजण विचारतात तुम्ही झोपता कधी? पण आम्ही झोपणारे नाही, झोप उडवणारे कार्यकर्ते आहोत,” असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आवाहन केले, “काम असे करा की ओळख बनो, प्रत्येक पाऊल असे टाका की निशाण राहो.”
‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’
“कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्याचे सांगत, एनडीएमध्ये शिवसेनेचे महत्त्वाचे स्थान असल्याचेही नमूद केले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रणनीती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ संबोधत शिंदे म्हणाले, “या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आणि जिंकणार आहोत.”
मित्रपक्षांतील मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी म्हटले, “आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे, मित्रांचा नाही.”
“प्रत्येक गावातील बूथवर कार्यकर्ता असावा, निवडणुकीत गाफील राहू नका. मतदार यादीकडे लक्ष ठेवा,” असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
‘जनतेला विकासाचे मारेकरी नको, वारकरी हवेत’
“राज्यातील जनतेला विकासाचे मारेकरी नकोत, तर वारकरी हवेत  आणि ते वारकरी तुम्ही आहात,” असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी पूर्ण नियोजन करा, नाराज कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवा आणि घराघरात शिवसेना पोचवा, असेही त्यांनी सांगितले.
“निवडणुका जिंकल्या तर पक्ष मोठा होईल, आणि पक्ष मोठा झाला की तुम्ही आपोआप मोठे व्हाल,” असे त्यांनी सांगत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
‘पैसे नव्हे, माणसे कमवा’
“पैसे आणि प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा माणसे कमवण्याचा अजेंडा माझा आहे. जिथे जातो, तिथे लोक प्रेम आणि आशीर्वाद देतात,” असे शिंदे म्हणाले.
“आपला शिव संकल्प आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपण्याचा, हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचा,” असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा शेवट केला.

Related Articles

Back to top button