ठाण्यात शिंदे सेनेला धक्का! महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, बालेकिल्ल्यात अस्वस्थतेची ठिणगी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
ठाणे : महापालिका निवडणूक अवघ्या उंबरठ्यावर असताना ठाण्यातील शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्ष नेतृत्वाला थेट धक्का दिला आहे. “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर काम करणे शक्य नाही,” असं कारण जरी त्यांनी दिलं असलं, तरी या राजीनाम्यामागे तीव्र अंतर्गत संघर्ष असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
निवडणुकीआधीच शिवसेनेत धुसफूस
ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानलं जाणारं शहर. आणि याच ठिकाणी ऐन निवडणुकीआधी शिवसेनेतील नाराजी उफाळून येणं ही बाब पक्षासाठी चिंताजनक मानली जात आहे. वरिष्ठ नेत्या आणि शिंदे गटातील विश्वासू मानल्या जाणाऱ्या मीनाक्षी शिंदेंनी उचललेलं हे पाऊल राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
‘निकटवर्तीय’ कारवाई ठरली कारणीभूत?
माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात विक्रांत वायचळ सक्रिय होते. वायचळ हे मीनाक्षी शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र पक्षविरोधी कारवाईच्या आरोपाखाली विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून थेट हकालपट्टी करण्यात आली आणि इथूनच असंतोषाला चिंगारी मिळाल्याचं बोललं जात आहे.
कारवाईनंतर स्फोटक राजीनामा
वायचळ यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे नाराज असल्याची चर्चा होतीच. अखेर त्यांनी थेट राजीनामा देत नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या काळात असा स्फोटक निर्णय घेतला जाणं पक्षासाठी डोकेदुखी वाढवणारं ठरत आहे.
2017 च्या विजयावर सावली?
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ठाण्यात 131 पैकी 67 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. आज मात्र त्यांचाच राजीनामा ठाण्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
पुढे काय?
मीनाक्षी शिंदेंची नाराजी शांत करण्यासाठी पक्ष नेतृत्व हालचाली करणार का? की हा राजीनामा ठाण्यातील शिवसेनेतील मोठ्या घडामोडींचा इशारा आहे? येणारे काही दिवस ठाण्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहेत.




