ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“टोलनाक्याजवळचा दरोडा, पोलिसांची धाडसी कारवाई, पण महामार्ग अजूनही धोक्यात…”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग… लाखो प्रवासी दररोज या महामार्गावरून जातात. पण त्याच वेगात वाढत आहे गुन्हेगारीची सावली. टोलनाक्याजवळच दरोडेखोर टोळी प्रवाशांवर झडप घालते, त्यांना झुडपात ओढून नेते, मारहाण करते आणि पैसे लुटते. हे दृश्य ऐकायला भयावह आहे, पण दुर्दैवाने सत्य आहे.
गेल्या काही दिवसांत अशा घटना वाढत असतानाच खालापूर पोलिसांनी वेळेत कारवाई करत एक दरोडेखोर टोळी जेरबंद केली आहे.
हे पोलिसांचं यश नक्कीच कौतुकास्पद आहे, पण प्रश्न तसाच उभा राहतो. एक्सप्रेस हायवे किती सुरक्षित आहे?

रात्रीची दहशत — महामार्गावर ‘कोयत्याचा खेळ’
पुण्याहून पनवेलकडे जाणारे दिनेश बुधराम गोदरा आणि त्याचा मित्र सुरेंद्र जांगु रात्री थांबले टॉयलेटसाठी. पुढच्याच क्षणी पाच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हाणामारी, कोयता गळ्यावर, आणि पाकिटातील सगळं लुटून टोळी काळोखात गायब.
रक्कम साडेसात हजार आणि २९ हजार रुपये, त्यासोबत आधारकार्ड आणि कागदपत्रंही हिसकावली गेली.
पोलिसांची सायरन गर्जना — ‘ऑपरेशन खालापूर’ सुरू!
घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अशोक जगताप, हवालदार संदेश कावजी, आणि शिपाई अर्जुन मोरे हे घटनास्थळी धावले.
आय.आर.बी. डेल्टा फोर्सचं पथकही तत्परतेने मदतीला आलं.
२०० मीटर अंतरावर संशयास्पद हालचाल आणि लगेच सापळा.
धाड पडली. चार जण अंधारात पसार, पण एक पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत संपूर्ण टोळीचा उलगडा झाला.
अनिल अशोक पवार, मंगेश भाऊ पवार, किशोर विठ्ठल पवार, संतोष हिलम आणि किशोर अशोक हिलम ही नावे समोर आली. तिघे अटकेत, दोघांचा शोध सुरू.
१५ हजार रुपये जप्त.

खालापूर पोलिसांवर शाबासकीची थाप
या कारवाईत खालापूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता म्हणजे गुन्हेगारीवर पहिली लढाई जिंकली, पण युद्ध अजून बाकी आहे.
कारण प्रवासी अजूनही या मार्गावर असुरक्षित आहेत.
…….
“प्रवासी व वाहनचालकांनी द्रुतगती मार्गावर केवळ अधिकृत ठिकाणीच थांबावे.
संशयास्पद हालचाल दिसल्यास ११२ वर तात्काळ फोन करावा.”- आँचल दलाल पोलिस अधीक्षक, रायगड
द्रुतगती मार्गावर अशी टोळी टोलनाक्याच्या अगदी पुढे थांबलेली असताना सीसीटीव्ही, पेट्रोलिंग आणि टोल व्यवस्थापन कुठं होतं?
प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गुन्हेगार इतक्या सहजतेने झुडपात थांबतात, हे अपयश कोणाचं?
आणि हीच घटना जर काही मिनिटं उशिरा पोलिसांच्या कानावर गेली असती, तर आज कदाचित ही बातमी गुन्हेगार नव्हे तर बळींबद्दल लिहिली गेली असती!
खालापूर पोलिसांनी वेळेत कारवाई करून प्रवाशांचा सन्मान वाचवला, पण हा दरोडा म्हणजेच प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या दाव्यांवर एक मोठ प्रश्न चिन्ह!
महामार्ग सुरक्षित तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा प्रवासी भीतीविना प्रवास करतील, आणि दरोडेखोर नव्हे तर कायद्याचं भय महामार्गावर राज्य करेल.




