“जिल्हा परिषदेचे अधिकारी उतरले शेतात; भात लागवडीचा घेतला अनुभव”

अलिबाग : भात लावणीच्या हंगामात शुक्रवारी (दि. ११) जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिखलात उतरून प्रत्यक्ष भात रोपांची लागवड करत शेतीचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने ‘एक दिवस शेतकऱ्यांसाठी’ या उपक्रमांतर्गत हा प्रयोग राबविण्यात आला.
रायगड जिल्हा हा राज्यात भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात भात लावणीचा हंगाम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या पुढाकाराने सर्व विभागप्रमुखांना शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भात लागवड करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील भाल गावातील शेतकरी कृष्णा दळवी यांच्या शेतावर भात लागवडीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “अधिकारी शेत पाहण्यासाठी येतात, पण प्रत्यक्ष शेतात उतरून आमच्यासोबत काम करणारे तुम्ही पहिले अधिकारी आहात.”
या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, जिल्हा कृषी अधिकारी निकिता सुर्यवंशी, तसेच अलिबाग व मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या, “शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर करावा व सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करावे. आपल्या कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.”