जातीय विषाने भरलेले कोथरूड पोलिस? एका मैत्रिणीला आधार दिल्यामुळे तिघा तरुणींवर अमानुष वागणूक — भारत जोडो अभियानचा संतप्त निषेध

पुणे :कोथरूड पोलिस ठाण्यात एका सासरच्या छळाला कंटाळून घर सोडून आलेल्या मैत्रिणीला आधार दिल्यामुळे तिला मदत करणाऱ्या तीन तरुणींवर जातीयवादी, क्रूर आणि अमानुष वागणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरोधात भारत जोडो अभियान, महाराष्ट्रने संतप्त निषेध व्यक्त केला आहे.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडूनच अशा खलप्रवृत्तीला पाठबळ दिले जात असेल, तर कायद्याचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेचा आपण निषेध करायलाच हवा, असा तीव्र सवाल भारत जोडो अभियानाने उपस्थित केला आहे.
पोलिसांची भूमिका पाहता ते कोणाला पाठीशी घालतात आणि कोणावर कारवाई करतात याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. कायद्याचे राज्य खरोखरच अस्तित्वात आहे का? की जात, वर्ग आणि राजकीय दबाव यावरच पोलिसांची दिशा ठरते, असा संशय निर्माण करणारी ही घटना असल्याचे अभियानाचे म्हणणे आहे.
भारत जोडो अभियानाने कोथरूड पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocities Act) तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
या प्रकरणात अन्यायग्रस्त मैत्रिणींच्या पाठीशी ठामपणे उभं राहत लढणाऱ्या श्वेता या तरुणीचे अभियानाने विशेष अभिनंदन केले आहे.
ही माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, “निर्माण” आणि “भारत जोडो अभियान” या चळवळींच्या सक्रिय मार्गदर्शक असलेल्या उल्का महाजन यांनी दिली. उल्का महाजन हे मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी गेली अनेक दशके झगडत आहेत.