ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
जय जिनेंद्रच्या दोन शब्दांत अजित पवारांचा घाव; मोहोळांना ‘माझ्या नादाला लागू नका’ असा थेट राजकीय इशारा?

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पुणे : “जय जिनेंद्र…” एवढेच दोन शब्द उच्चारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अप्रत्यक्ष पण अत्यंत अचूक असा राजकीय घाव घातला. कोणताही थेट आरोप नाही, कोणतीही फाईल हातात नाही, तरीही “त्या जमिनीचं पुढे काय झालं?” असा थेट सवाल उपस्थित करणारा हा प्रहार मोहोळांसाठी चांगलाच अस्वस्थ करणारा ठरल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
अवघ्या दोन शब्दांतच मोहोळांच्या राजकीय इतिहासातील एक संवेदनशील आणि वादग्रस्त अध्याय पुन्हा उघडत अजित पवारांनी “माझ्या नादाला लागू नका” असा थेट, पण न बोलता दिलेला इशारा असल्याचं मानलं जात आहे. शब्द कमी, पण वार जबरदस्त अशा शैलीत अजित पवारांनी पुण्याच्या राजकारणात एकाच वाक्यात खळबळ उडवून दिली आहे.
माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण आज माझ्यावर आरोप करणारेच लोक माझ्यासोबत सत्तेत बसले आहेत की नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या एका प्रश्नातूनच विरोधकांच्या आरोपांची धार बोथट करत, आरोप करणारे आणि सत्तेतील भागीदार यांच्यातील दुटप्पीपणावर अजित पवारांनी बोट ठेवलं आहे.
पुण्याच्या राजकारणात सध्या गाजत असलेला ‘जय जिनेंद्र’ हा शब्द कोणत्याही धार्मिक भावनांना धक्का देणारा नाही, तर तो एका जुन्या, दडपून टाकलेल्या आणि वादग्रस्त प्रकरणाची जाणीव करून देणारा राजकीय संदर्भ असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अजित पवारांनी हा शब्दप्रयोग मुद्दाम आणि नेमक्या संदर्भासह वापरत मोहोळांना लक्ष्य केलं असून, त्यामागचा रोख पूर्णतः राजकीय आणि वास्तवाशी जोडलेला असल्याचा दावा केला जात आहे.
‘जय जिनेंद्र’ हे जैन धर्मीयांमधील अभिवादन असून भगवान महावीरांच्या विचारांशी जोडलेलं आहे. मात्र अजित पवारांच्या वक्तव्यात या शब्दाचा वापर धर्माशी छेडछाड करण्यासाठी नव्हे, तर जैन समाजाशी संबंधित एका गंभीर जमीनप्रकरणाची आठवण करून देण्यासाठी करण्यात आला, असा स्पष्ट संदेश या वक्तव्यातून जात असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
पुण्यातील जैन धर्मीयांच्या मालकीच्या एका अत्यंत मौल्यवान जमिनीवर मुरलीधर मोहोळ यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप त्या काळात उघडपणे झाले होते. संबंधित जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असताना, ती अत्यल्प मोबदल्यात हस्तगत करण्याचा डाव रचल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. कोट्यवधींची जमीन आणि मोजक्या रकमेत व्यवहार या कथित सूत्रामुळेच हे प्रकरण चांगलंच पेटलं होतं.
या व्यवहारात मोहोळ यांचा थेट सहभाग असल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात झाली. जैन समाजात तीव्र असंतोष उसळला, आंदोलनाची भाषा सुरू झाली आणि दबाव दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सामाजिक आणि राजकीय दबाव इतका प्रचंड झाला की मोहोळांना या व्यवहारातून माघार घ्यावी लागली. त्यानंतर संबंधित जमीन थेट जैन बोर्डाकडे देण्यात आली—हा घटनाक्रम आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमनेसामने ठाकले असताना, जुन्या वादग्रस्त फाईल्स पुन्हा बाहेर काढल्या जात आहेत. ‘जय जिनेंद्र’चा हा संदर्भ त्याच राजकीय संघर्षाचा भाग असून, धर्माच्या नावाखाली नव्हे तर जमीन, सत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या मुद्द्यावरून करण्यात आलेला हल्ला असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
एकूणच, अजित पवारांचा हा शब्दप्रयोग धार्मिक भावना दुखावणारा नाही, तर मुरलीधर मोहोळांच्या राजकीय कारकिर्दीतील एका वादग्रस्त अध्यायाकडे थेट बोट दाखवणारा ठरतो आहे आणि 70 हजार कोटींच्या आरोपांवरील सवालासह पुण्याचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे.




