ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

‘जनता संवाद’ व्यासपीठातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध– खासदार सुनील तटकरे


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड :  “जनता संवाद या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना थेट आपल्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याची संधी मिळते. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत,” असे मत खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

सुतारवाडी येथे रविवारी ‘जनता संवाद’ हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक, पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

या संवादादरम्यान नागरिकांनी आपल्या भागांतील दैनंदिन अडचणी, प्रलंबित मागण्या तसेच विकासकामांशी निगडीत प्रश्न मांडले. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या अडचणी, वीज वितरणातील समस्या, शाळा व आरोग्यसेवा सुधारणा, तसेच गावपातळीवरील मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भातील मागण्या विशेषत्वाने पुढे आल्या.

खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधत सर्व मुद्दे काळजीपूर्वक ऐकले. काही तातडीच्या समस्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तर उर्वरित विषयांवर लवकरच समाधानकारक तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.

या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी तटकरे यांच्या पुढाकाराचे स्वागत करत भविष्यातही अशा संवाद कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.


Related Articles

Back to top button