ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
“चार देशांची चौकडी आणि पाश्चिमात्यांचे गणित उद्ध्वस्त”
भार, चीन, उत्तर कोरिया आणि इराण रशियाच्या मागे राहिले खंबीरपणे उभे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अमेरिका आणि युरोप नेहमी स्वतःला जगाचे तारणहार समजतात. “लोकशाही”, “मानवी हक्क” यांची मोठी भाषणे देतात; पण गरज पडली की हुकूमशाही देशांनाही कवेत घेतात. एकदा तेल हवे असेल तर गल्फमधल्या राजांना राजा मानतात, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच हुकूमशहा म्हणून हिणवतात. हा दुटप्पीपणा जगाला नवा नाही, पण आता त्यांचा मुखवटा पूर्णपणे गळून पडला आहे.

रशियावर निर्बंध टाकून त्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा हिशोब पाश्चिमात्यांनी मांडला होता. पण चीनसारखा “आर्थिक राक्षस”, भारतासारखा “बाजारपेठेचा बादशहा”, उत्तर कोरियासारखा “तोफखान्याचा वेडा” आणि इराणसारखा “ड्रोनवाला दोस्त” रशियाच्या मागे उभे राहिले. आणि बस्स! पाश्चिमात्यांच्या टेबलावरचा सगळा हिशोब गोंधळून गेला.

अमेरिका रशियाला गुडघ्यावर आणेल म्हणत होती; पण आता तिचीच पाठ दुखून बसली आहे. युरोप रशियाला एकटे पाडेल म्हणत होता; पण स्वतःच गॅस आणि इंधनाच्या टंचाईत तडफडतो आहे. मोठमोठी तोंडं करून “आम्ही जगाचे पोलीस” म्हणणाऱ्यांना आता स्वतःच्या अंगणात “तीळ पापड” होतोय, हेच खरे.

आज परिस्थिती एवढी उलटली आहे की, पाश्चिमात्य देशांनी उभारलेली “नैतिकतेची भिंत” वाऱ्याच्या झोताने कोसळली आहे. निर्बंधांच्या नावाखाली त्यांनी मांडलेला डाव, या चार देशांच्या एकतेने अक्षरशः फाडून काढला आहे.
पाश्चिमात्यांच्या खोट्या वर्चस्वाचा आता फडशा पडला आहे.
त्यांचा “लोकशाहीचा उपदेश” हा केवळ पोकळ घंटानाद ठरला आहे.
आणि चार देशांच्या पाठिंब्यामुळे रशियाच्या अंगणात दिवाळी झाली, तर पाश्चिमात्यांच्या घरात “तीळ पापड” सुरू झाला आहे.



