ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
ग्रामीण भारतातील STEM क्रांती : रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी संधीचे नव अवकाश
रायगडमधून घडणार भविष्यातील शास्त्रज्ञांची पिढी–राष्ट्रीय आविष्कार अभियान 2025–2026 मधून थेट इस्रोपर्यंतचा प्रवास

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : कधी काळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर, परीक्षेपुरते प्रश्न आणि मर्यादित संधी असे समीकरण होते. मात्र आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. STEM शिक्षण (Science, Technology, Engineering, Mathematics) केंद्रस्थानी ठेवत राबवले जाणारे उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाचे उपभोक्ते नव्हे, तर संशोधनाचे सहभागी बनवत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविले जाणारे राष्ट्रीय आविष्कार अभियान 2025–2026 हे याचे ठळक उदाहरण ठरत आहे.
STEM : कौशल्याधारित शिक्षणाची नवी वाट
STEM शिक्षण म्हणजे केवळ चार विषयांचे संकलन नाही, तर समस्या ओळखणे, प्रयोग करणे, निरीक्षणातून निष्कर्ष काढणे आणि नवकल्पना विकसित करणे ही संपूर्ण प्रक्रिया आहे. ग्रामीण भागात जिथे संसाधने मर्यादित असतात, तिथे अशा अनुभवाधारित शिक्षणाची संधी मिळणे म्हणजे एक प्रकारची शैक्षणिक क्रांतीच आहे. आजचे शाळकरी विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि संशोधक घडावेत, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
राष्ट्रीय आविष्कार अभियान 2025–2026 अंतर्गत इयत्ता 6 वी ते 8 वी मधील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील विज्ञान न शिकवता, प्रत्यक्ष संशोधन संस्थांमध्ये जाऊन विज्ञान अनुभवण्याची संधी दिली जाणार आहे.
या उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बंगळुरू येथील Indian Space Research Organisation (इस्रो) येथे होणारी शैक्षणिक अभ्यास भेट. उपग्रह, रॉकेट, अंतरिक्ष मोहिमा कशा रचल्या जातात, याची थेट ओळख विद्यार्थ्यांना येथे मिळणार आहे.
या अभ्यास भेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी 13 जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून 45 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

प्रयोगशाळेतून अंतरिक्ष संशोधनापर्यंत
या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरील नामांकित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्यात येणार आहे. राज्यांतर्गत अभ्यास भेटीत खालील संस्थांचा समावेश आहे :
IISER Pune- Indian Institute of Science Education and Research, Pune
(भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे), IUCAA- Inter-University Centre for Astronomy and Astrophysics
(आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र, पुणे), NIV Pune- National Institute of Virology (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे), NCL Pune- National Chemical (लेबर्टरी मराठी: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे), IITM Pune- Indian Institute of Tropical मीटवरयॉलॉजि (भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे)
या संस्थांमधील प्रयोगशाळा, संशोधन प्रकल्प आणि वैज्ञानिक प्रक्रिया पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
लहान वयात विज्ञानाची गोडी
ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण व्हावी, संशोधनाकडे ओढ वाढावी आणि करिअरच्या नव्या दिशा खुल्या व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन विज्ञान अनुभवण्याची ही संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
निवड प्रक्रिया
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमातील जिल्ह्यातील प्रथम तीन शाळांमधून प्रत्येकी 6 असे 18 विद्यार्थी, तसेच इतर शाळांमधील 27 विद्यार्थी, अशा एकूण 45 विद्यार्थ्यांची निवड अभ्यास भेटीसाठी करण्यात येणार आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान परीक्षेत आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.




