ताज्या बातम्यारायगड
गाव तिथं बँक शिबिर; जनधन खात्यांचं री-केवायसी आणि विमा योजनांची नोंदणी सुरु

रायगड : जिल्ह्यात जनधन खात्यांचे री-केवायसी (Re-KYC) आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी सुलभ करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबवले जात असून, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी सर्व खातेदारांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाली. शिबिरांमध्ये बँक ग्राहक जनधन खात्यांचे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आवश्यक असलेले री-केवायसी करू शकतील, तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे.
या अभियानाअंतर्गत ८ ऑगस्ट २०२५ रोजी सेंट्रल स्कूल, आमटेम (ता. पेण) येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साकव प्रकल्प संस्था, पेण यांच्या सहकार्याने आयोजित या मेळाव्यात पाबळ खोऱ्यातील कोंढवा, वरप, जिर्णे येथील आदिवासी बांधवांना जनधन खाते व सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.
गावोगावी शिबिरे कधी होणार याची माहिती संबंधित बँक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात मिळू शकते, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.