गावच्या मातीतून दिल्लीत पोहोचलेले यश; रायगडचे अतिरिक्त सीईओ सत्यजित बडे आयएएस

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : प्रशासकीय सेवेत सातत्य, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कामगिरीच्या जोरावर रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) झेप घेतली आहे. विकास सेवेतून सर्वोच्च प्रशासकीय सेवेकडे केलेली ही वाटचाल अनेक तरुण अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सन २००० मध्ये महाराष्ट्र विकास सेवेत प्रवेश केलेल्या बडे यांनी गेली अडीच दशके राज्याच्या ग्रामीण व जिल्हास्तरीय प्रशासनात ठसा उमटवला. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रत्येक जबाबदारीत त्यांनी कामापेक्षा परिणामांवर भर दिला.
कोल्हापूर येथे १९७३ मध्ये जन्मलेल्या सत्यजित बडे यांनी पुण्यातील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेतून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासातून त्यांनी सन २००० मध्ये विकास सेवेत यश संपादन केले. प्रशासकीय क्षेत्राशी त्यांचा परिचय हा केवळ पदापुरता मर्यादित नव्हता. वडील कै. देवीदास बडे हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी सातारा जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. या पार्श्वभूमीमुळे प्रशासनातील मूल्ये, शिस्त आणि जबाबदारी यांची जाण लहानपणापासूनच त्यांच्या जडणघडणीत रुजली.
सन २००२ ते २००७ या कालावधीत आंबेगाव आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी विकासकामांना गती दिली. पुढे पुणे आणि सातारा जिल्हा परिषदांमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षमतेचा आदर्श ठेवला.
सन २०१९ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली. सन २०२३ पासून ते रायगड जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांचे काम विशेष लक्षवेधी ठरले आहे.
गटविकास अधिकारी असताना विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन २०१२ मध्ये मिळालेला ‘यशवंत गुणवंत अधिकारी’ पुरस्कार त्यांनी अत्यल्प वयात मिळवून वेगळी ओळख निर्माण केली. यशवंत पंचायतराज अभियानातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.




