ताज्या बातम्यारायगड
गावकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला आज पूर्णविराम – नवे सभागृह लोकार्पण
नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या हस्ते लोकार्पण

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : गावाच्या मध्यवर्ती भागात अनेक वर्षे पडिक, उध्वस्त अवस्थेत उभ्या असलेल्या इमारतीने आज नवसंजीवनी घेतली आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल ३.५ लाख रुपये खर्च करून या जिर्ण इमारतीचे रूपांतर आता एका आकर्षक व सुसज्ज कम्युनिटी हॉलमध्ये झाले आहे.

या नूतनीकरणामुळे गावकऱ्यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी व सोयीस्कर जागा उपलब्ध झाली आहे. स्थानिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता होत असल्याने उद्घाटनावेळी ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण पार पडले. माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सदस्या मंगल नागे, प्रियांका काठे, सदस्य आदेश मोरे, तसेच बुरुड समाज अध्यक्ष नागे, रविंद्र नागे यांसह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना सरपंच हर्षदा मयेकर म्हणाल्या, “गावाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याची सोय गरजेची होती. हा हॉल ग्रामस्थांच्या सर्व उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल आणि सामाजिक विकासाला चालना देईल.”

गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यातील लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक मेळावे अशा सर्वच उपक्रमांना “आपली” जागा मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.



