गणेशोत्सवास ‘राज्यमहोत्सव’ दर्जा; महाराष्ट्रात उत्सवाचा नवा अध्याय सुरू — आशिष शेलार
पीओपीवरील बंदी मागे; मूर्तिकारांचा सन्मान, रोजगार वाचवला

रायगड : गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित करण्यात आले असून, यापुढे हा उत्सव अधिक व्यापक आणि उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. हमरापूर (तांबडशेत, पेण) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी मूर्तिकारांच्या संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलिमा पाटील, तसेच मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी अभय म्हात्रे, कुणाल पाटील, नितीन मोकल, हितेश जाधव, सुनील पाटील आणि अनेक गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीओपीवरील बंदी उठवण्यात यश
शेलार म्हणाले, “पीओपी मूळे पर्यावरणास धोका असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आम्ही उच्च न्यायालयात सशस्त्र लढा दिला. वैज्ञानिक पुरावे सादर करून प्रदूषण होत नाही हे सिद्ध केलं आणि पीओपीवरील बंदी हटवण्यात यश मिळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळेच हा विजय शक्य झाला.”
“या निर्णयामुळे राज्यातील लाखो मूर्तिकार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय आणि रोजगार वाचला. सरकारने मूर्तिकारांच्या पाठीशी उभं राहून हा ऐतिहासिक लढा जिंकला, आणि आपल्या सण-परंपरेचं रक्षण केलं,” असे ते म्हणाले.
मूर्तिकारांचा सन्मान
खासदार धैर्यशील पाटील यांनी शेलार यांचा सत्कार करताना सांगितले की, “पीओपीवरील बंदीमुळे मूर्तिकारांच्या व्यवसायावर मोठं संकट आलं होतं. ते संकट दूर करून त्यांनी मूर्तिकारांचा सन्मान आणि जगण्याचा आधार वाचवला. तसेच महाराष्ट्रातील १२ गडकिल्यांना जागतिक दर्जा मिळवून देणारे ते पहिले सांस्कृतिक मंत्री आहेत.”
आमदार रवींद्र पाटील आणि प्रशांत ठाकूर यांनीही आपली मनोगते व्यक्त करून शेलार यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन कुणाल पाटील यांनी केले.
—