ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

गंभीर आजारांवर ‘वेदना नव्हे तर सन्मान’ – गावागावात सुरू होणार पॅलीएटिव्ह केअर सेवा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |
गंभीर आजार म्हणजे केवळ उपचारांची लढाई नसून वेदना, मानसिक ताण आणि कुटुंबाच्या आर्थिक ओझ्याची झुंज असते. ही झुंज आता शहरापुरती मर्यादित राहणार नाही. महाराष्ट्र शासनाने पॅलीएटिव्ह केअर (उपशामक काळजी) सेवा गावपातळीपर्यंत पोहोचवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून जिल्हा रुग्णालयासह सर्व स्तरांवरील आरोग्य केंद्रांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे.
त्यामुळे कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू विकार आणि वृद्धापकाळातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान चार ते सहा बेड उपशामक काळजीसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने २ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन निर्णय जारी करत पॅलीएटिव्ह केअरला ऐच्छिक नव्हे तर अत्यावश्यक आरोग्य सेवा म्हणून मान्यता दिली आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र या सर्व ठिकाणी पॅलीएटिव्ह केअर सेवा उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत गंभीर रुग्णांना उपचारासाठी शहरातील मोठ्या रुग्णालयांची धाव घ्यावी लागत होती; आता उपचार रुग्णाच्या जवळ येणार आहेत. या सेवेत आजाराचे निदान झाल्यापासून संपूर्ण उपचारकाळात मदत, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, प्रशिक्षित डॉक्टरांची बहुविषयक टीम, घरपोच सेवा तसेच कुटुंबीयांना रुग्णाची काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रुग्णाला बरे करणे हा उद्देश नसून वेदना कमी करून जीवनाचा दर्जा सुधारणे आणि अंतिम टप्प्यात सन्मान राखणे हा या सेवेचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ती औषधे लिहून देऊ शकणार असल्याने वेदना नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात धावपळ करण्याची गरज राहणार नाही. याशिवाय जिल्हा पॅलीएटिव्ह केअर समिती जीवघेण्या किंवा असाध्य आजारग्रस्त रुग्णांची नोंद करून घरभेटीद्वारे सेवा देणार असून नॅशनल प्रोग्रॅम फॉर पॅलीएटिव्ह केअर अंतर्गत उपचारांचा समन्वय साधणार आहे.
या योजनेमुळे रुग्णांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचणार असून घराजवळ उपचार, मानसिक आधार आणि कुटुंबीयांवरील ताण कमी होणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
ही योजना केवळ आरोग्य सेवा नसून आरोग्य व्यवस्थेच्या विचारसरणीतील बदल मानली जात आहे. आतापर्यंत व्यवस्था रुग्णाला रुग्णालयात आणत होती; आता व्यवस्था रुग्णाच्या दारात जाणार आहे. उपचार, काळजी आणि सन्मान या तीन टप्प्यांत आरोग्य व्यवस्थेला मानवी चेहरा देणारा हा निर्णय ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
——
“गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी पॅलीएटिव्ह केअर सेवा दिलासादायक ठरणार आहे. ग्रामीण स्तरावर वेळेत व योग्य उपचार मिळतील. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.”
— नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
—–
पॅलीएटिव्ह केअर संकल्पनेचा उगम?
…..
पॅलीएटिव्ह केअर (उपशामक काळजी) संकल्पनेचा आधुनिक उगम 1960 च्या दशकात इंग्लंडमध्ये झाला. सिसिली सॉन्डर्स यांनी 1967 मध्ये लंडन येथे सेंट ख्रिस्तोफर हॉस्पिस सुरू करून असाध्य आजारांतील रुग्णांना वेदनामुक्त व सन्मानजनक आयुष्य देण्याची संकल्पना जगासमोर मांडली आणि पुढे जागतिक आरोग्य संघटनेनेही या पद्धतीला मान्यता दिली. भारतात ही सेवा 1980 च्या दशकात सुरू झाली; 1986 मध्ये मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्करोग रुग्णांसाठी उपशामक उपचार सुरू झाले. त्यानंतर केरळमध्ये 1990 च्या दशकात समुदाय आधारित मॉडेल विकसित झाले आणि 2012 मध्ये केंद्र सरकारने नॅशनल प्रोग्रॅम फॉर पॅलीएटिव्ह केअर सुरू करून ही सेवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट केली.

Related Articles

Back to top button