ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

खोपोलीत रक्तरंजित सकाळ नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा संशय


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : खोपोली शहर शुक्रवारी (दि. 26 डिसेंबर) सकाळी अक्षरशः हादरून गेले. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (वय 45) यांची भरदिवसा तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, राजकीय वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.
शाळेतून परतताना थरकाप उडवणारा हल्ला
मंगेश काळोखे आपल्या मुलींना शाळेत सोडून सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घरी परतत असताना, साईबाबा नगर परिसरातील जया बारजवळ अचानक एका अज्ञात वाहनातून चार ते पाच जण उतरले. हल्लेखोरांनी काळोखे यांच्या दुचाकीसमोर स्वतःचे वाहन आडवे घातले आणि क्षणात तलवार, कोयता व कुऱ्हाडीने डोक्यावर व शरीरावर सपासप वार केले. अवघ्या काही मिनिटांतच मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले.
15–20 वर्षांच्या राजकीय वादाची पार्श्वभूमी
मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. याच निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता. काळोखे व देवकर कुटुंबांमध्ये तसेच त्यांच्या राजकीय गटांमध्ये गेली 15–20 वर्षे तीव्र वाद सुरू असल्याची चर्चा आहे. निकालाच्या दिवशीदेखील किरकोळ वाद झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.
तक्रारीत धक्कादायक आरोप
मयताचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते रवींद्र देवकर यांची मुले दर्शन व धनेश, त्यांचा अंगरक्षक तसेच खुनाच्या कटात सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ता भरत भगत यांच्यावरही कट रचल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“पोलीसांनी दुर्लक्ष केले” – नातेवाईकांचा आरोप
काळोखे यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मंगेश काळोखे यांच्यावर पाळत ठेवली जात होती व परिसरात एक संशयास्पद वाहन फिरत होते. याबाबत पोलिसांना कल्पना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शहरात उद्रेक; महामार्ग दोनदा रोखला
हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला. आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त महिलांनी आणि युवकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. दोन वेळा महामार्ग अडवण्यात आला. महिला पोलीस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये शाब्दिक वाद होऊन वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ ठोकून तपास
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपअधीक्षक अभिजित शिवथरे आणि गुप्तहेर शाखेचे निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोलीत तळ ठोकला आहे. त्यांच्या आदेशानुसार खालापूर उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
 “प्लॅनिंग मर्डर”चा आरोप
मंगेश काळोखे हा निष्ठावान शिवसैनिक होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच राजकीय सूडातून नियोजनबद्ध हत्या केल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगल यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुतण्याच्या तक्रारीतील तपशील
तक्रारीनुसार, जया बारसमोरील चौकात दर्शन देवकर, सचिन चव्हाण व इतरांनी पाठलाग करून मंगेश काळोखे यांना खाली पाडले आणि तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करत जिवे ठार मारले. खोपोलीच्या इतिहासात कधीही न पाहिलेला असा हा रक्तरंजित प्रकार असून, बीडसारख्या घटनांचीच प्रचिती आता रायगडला येतेय का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. आरोपी फरार असल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील काही तासांत या प्रकरणाचा उलगडा होतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे.
…..

Related Articles

Back to top button