खुशबूला न्याय नाही, तर १५ ऑगस्टनंतर मोठा उठाव! – तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

पेण : वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरेच्या मृत्यू प्रकरणात चौकशी अहवाल व केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट मिळवण्यासाठी तहसीलदार व पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्रव्यवहार करत मदत मागितली आहे. त्या अनुषंगाने तपास प्रक्रियेस मदत केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे.
खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात सहा महिने उलटूनही दोषींवर गुन्हे दाखल न झाल्याने, खुशबूचे पालक, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते.
या प्रकरणात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:
1. चौकशी समितीचा अहवाल व केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट पोलिसांना तात्काळ सुपुर्द करून सार्वजनिक करावा.
2. पालक व सामाजिक संघटनांच्या निवेदनाच्या आधारे दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3. चौकशी समितीने आरोग्य अधिकारी डॉ. (सौ.) विखे यांचा जबाब ग्राह्य धरू नये, तर विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पदावरून दूर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
4. कुटुंबीयांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी.
5. आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी धोरणात्मक निर्णय घेतले जावेत.
आंदोलनादरम्यान तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलकांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून अहवाल व रिपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी १५ ऑगस्टपर्यंतचा वेळ देत ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
संतोष ठाकूर यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.”
या आंदोलनात नामदेव ठाकरे, शेवंती ठाकरे, राघ्या ठाकरे, संतोष ठाकूर, राजेश रसाळ, महेश पाटील, नरेश कडू, महादेव शीद, अशोक शिद, लक्ष्मण मेंगाळ, जानू वाघमारे, चंद्रकांत खाकर, हरी शिद, मीनल तांडे आदींसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते.