ताज्या बातम्यारायगड
खड्ड्यांनी रस्ते गिळले, प्रशासन बेशुद्ध — शेकापचा संताप उसळला, PWD-ZPला थेट दम भरला

रायगड : जिल्ह्यात गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर असताना रस्त्यांची अवस्था अक्षरशः युद्धभूमीसारखी झाली आहे. खड्ड्यांनी गिळलेल्या रस्त्यांवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे! वाहनधारकांच्या चाकांना आणि पादचाऱ्यांच्या पायांची कसोटी लागली आहे, पण प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. जनतेच्या संतापाचा स्फोट अखेर आज झाला आणि शेतकरी कामगार पक्षाने थेट सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद कार्यालयावर हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
शेकाप महिला आघाडी राज्य प्रमुख मानसी म्हात्रे नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता शेतकरी भवनातून निघालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयांवर मोर्चा नेला. मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि गणेशोत्सवाआधी दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी ठाम मागणी प्रशासनासमोर ठेवण्यात आली.
या हल्लाबोलात सुरेश घरत, सतीश प्रधान, अनिल चोपडा, संजना किर, विक्रांत वार्डे, नागेश्वरी हेमाडे, नंदू गावडे, अशोक प्रधान, ढवळे, निलेश खोत, विकास घरत, निनाद रसाळ यांच्यासह शेकापचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
शेकापने प्रशासनाला दिला अंतिम इशारा —
“गणेशोत्सवाआधी रस्ते दुरुस्त नाही झाले, तर यापेक्षा मोठे, उग्र आणि झणझणीत आंदोलन होईल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची!”