ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

क्रिकेटच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प; रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
पेण : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (आरडीसीए) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी पेण येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. आगामी क्रिकेट हंगामात जिल्ह्यातील सर्व वयोगटातील मुला–मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करून क्रिकेटचा दर्जा उंचावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
गतवर्षी ३७५ सामने आणि १५ आंतरजिल्हा दोन दिवसीय सामन्यांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने होत असल्याने संघटनेचा कारभार पारदर्शक झाला असल्याची माहिती सचिव प्रदीप नाईक यांनी दिली. तसेच गत हंगामात रायगडातील १३ एमसीए पंच आणि १५ स्कोअरर उत्तीर्ण झाले असून रायगडच्या साची बेलोसे हिने पहिली महिला पंच म्हणून मिळवलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
रायगडमध्ये अधिक प्रशिक्षित पंच आणि स्कोअरर घडवण्यावर असोसिएशनचा भर असून, स्वतःचे क्रिकेट मैदान मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. जागा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मोठी आर्थिक मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेदरम्यान सदस्यांनी क्रिकेटविषयक विविध कार्यक्रम आणि प्रक्रियांबाबत सूचना केल्या असून त्या अमलात आणण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले. सभेला आरडीसीएचे पदाधिकारी, आजीवन सदस्य, विविध क्लब व अकॅडमी प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button