ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कोर्लई जिल्हा परिषद मतमोजणीत अनियमिततेचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका—स्थानिक आमदारांच्या दबावाचाही गंभीर आरोप


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट क्र. ३७ – कोर्लई (ता. मुरुड) येथील निवडणुकीच्या मतमोजणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप उमेदवार ॲड. महेश मोहिते यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया एकतर्फी पार पडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एडवोकेट महेश मोहिते यांनी सदरची माहिती दिली याप्रसंगी उमेदवार एडवोकेट मनस्वी मोहिते आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
९ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मतमोजणीत एकूण ३९ ईव्हीएम मशीनची पाच फेऱ्यांत मतमोजणी करण्यात आली. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार करण्यात आल्याचा आरोप अर्जात नमूद आहे.
फॉर्म व्हीएम-४ मध्ये ईव्हीएममधील आकडेवारी नोंदविताना आवश्यक त्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या नसल्याचे तसेच काही मतदान केंद्रांवरील मतसंख्या आणि नोंदविलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे म्हटले आहे. विशेषतः मतदान केंद्र क्र. ३७-१ मधील आकडेवारीबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या उमेदवार ज्योती रमेश नागावकर यांना विजयी करण्याच्या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी व पर्यवेक्षक यांनी पक्षपातीपणे काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर प्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून फेरमतमोजणी करावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. “मेरिटवर आम्हालाच न्याय मिळेल,” असा विश्वास ॲड. महेश मोहिते व ॲड. मनस्वी मोहिते यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button