ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कोंडीत अडकले भविष्य; परीक्षार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन

रस्ते काम सुरू, पण नियोजन गायब; जिल्हा प्रशासन-पोलीस झोपेत, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग 

अलिबाग–रोहा मुख्य मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे अलिबाग ते बेलकडे या भागात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने सकाळच्या वेळेतच विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असून अनेकांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विकास पिंपळे यांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या वाहनावरून त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत सोडावे, जेणेकरून त्यांना वेळेत परीक्षेला पोहोचता येईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समाज आणि प्रशासन दोघांनीही संवेदनशीलतेने सहकार्य करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रस्त्याचे खोदकाम, अर्धवट डांबरीकरण, अरुंद मार्ग आणि योग्य वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पर्यायी मार्गांची माहिती नसणे, डायव्हर्शन बोर्डांचा अभाव आणि आवश्यक त्या प्रमाणात ट्रॅफिक पोलिस नसल्याने सर्व वाहने एका ठिकाणी अडकतात. परिणामी शाळा बस, रुग्णवाहिका आणि खासगी वाहने एकाच कोंडीत अडकत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सकाळच्या वेळेत विशेष वाहतूक नियंत्रण ठेवणे, तात्पुरता मोकळा मार्ग उपलब्ध करणे तसेच रस्त्याच्या कामाच्या वेळेत बदल करणे आवश्यक असल्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या वेळेचे महत्त्व ओळखून संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
…..

Related Articles

Back to top button