ताज्या बातम्यारायगड
रायगडच्या पायऱ्यांचा मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार

रायगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर तातडीने बंदी घातली आहे. पावसाळा संपेपर्यंत हा मार्ग पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, या मार्गावर पावसाचे पाणी मोठ्या वेगाने वाहत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, जे तत्काळ अंमलात आणले गेले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संयुक्त बैठकीत झाली. पर्यटकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्गाबाबत कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी संयम बाळगून हवामान स्थिर होईपर्यंत किल्ल्यावर जाणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पावसाळ्यात किल्ल्याच्या इतर मार्गांचीही सतत पाहणी करण्यात येत असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.