ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
काँग्रेसच्या दंडात बळ भरण्यासाठी शेकाप–उबाठा एकवटले” रायगडमध्ये राजकीय समीकरणांना नवी कलाटणी” ‘गद्दारांना धडा’च्या घोषणेसह राजाभाऊ ठाकूर मैदानात उतरले”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
काँग्रेसच्या दंडात बळ भरण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिकेत उतरल्याने रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला नवा राजकीय वळण मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या या आक्रमक रणनीतीमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा वेग वाढला असताना, काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शेकाप आणि शिवसेना उबाठाने घेतल्याने महाविकास आघाडीची ताकद अधिक मजबूत झाली आहे. या एकजुटीचा केंद्रबिंदू ठरले आहेत. आवास जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर, ज्यांनी प्रचारात आक्रमक सूर पकडत जनतेत थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे.

राजाभाऊ ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“ही लढाई फक्त एका उमेदवाराची नाही, तर जनतेच्या विश्वासाची आहे. काँग्रेसच्या दंडात बळ भरण्यासाठी शेकाप आणि शिवसेना उबाठा आमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.”
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक सुरू झालेल्या विकासकामांवरही त्यांनी खोचक टीका केली.
“निवडणुका जवळ आल्या की रस्ते, पाणी, कामांची लगबग सुरू होते. पण जनता दूधखुळी नाही. राजकारण काय चाललंय, हे सगळ्यांना कळतं. तरीही कामं होत असतील, तर निवडणुका रोज झाल्या तरी हरकत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उबाठाने याआधी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत, ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून जनतेच्या प्रश्नांसाठीची दीर्घकालीन बांधिलकी असल्याचा दावा राजाभाऊ ठाकूर यांनी केला.
महाविकास आघाडीच्या या एकवटलेल्या शक्तीमुळे सातही मतदारसंघांमध्ये प्रभाव दिसून येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रस्तोरस्तीचा प्रचार, बैठका, सभा आणि घराघरांत पोहोचणारा संवाद यामुळे काँग्रेसला मिळणाऱ्या या नव्या बळाचा राजकीय परिणाम स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
रायगडच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे. शेकाप आणि शिवसेना उबाठाच्या आक्रमक पाठिंब्यामुळे काँग्रेसची ताकद किती वाढणार, आणि मतदारांचा कौल या बदललेल्या समीकरणांना कोणत्या दिशेने नेणार?आता निकालाच्या दिवशीच या राजकीय गणिताचा खरा हिशोब समोर येणार आहे.




