ताज्या बातम्या
कर्जत कृषी संशोधन केंद्रात ‘कृषी सप्ताहा’चा उत्साहात समारोप; वृक्षारोपण आणि बीजोत्पादनाला प्राधान्य

कर्जत : कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘कृषी दिन’ आणि १ ते ७ जुलैदरम्यान आयोजित ‘कृषी सप्ताहा’चा समारोप उत्साहात पार पडला.
या विशेष निमित्ताने केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून राज्याच्या हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमात डॉ. पुष्पा पाटील (वनस्पती रोग शास्त्रज्ञ), डॉ. विजय सागवेकर (कृषिविद्यावेत्ता), डॉ. रवींद्र मर्दाने (कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ), डॉ. वैशाली सावंत (कीटक शास्त्रज्ञ), डॉ. महेंद्र गवई (कनिष्ठ भात पैदासकार), डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. राजेंद्र सावळे, कृषी पर्यवेक्षक महेश घारपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रवींद्र मर्दाने यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर भाष्य करताना, “अन्नधान्य, दुग्धोत्पादन, सिंचन, ग्रामविकास आणि कृषि शिक्षण क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळेच राज्य पुढे गेले. ते आधुनिक महाराष्ट्राचे खरे महानायक होते,” असे नमूद केले.
कृषी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात पैदास विभाग व एम.ए.ई. प्रक्षेत्रांवर शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण केले. डॉ. वाघमोडे यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत “प्रत्येकाने वृक्ष लावणे आणि त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले.
सप्ताहाच्या अंतिम दिवशी, कर्जत-५ बीजोत्पादन प्लॉटचे पूजन डॉ. वाघमोडे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर पेढे वाटप करून लावणीने कृषी सप्ताहाचा उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. विजय सागवेकर, डॉ. मीनाक्षी केळुसकर, डॉ. महेंद्र गवई आणि वरिष्ठ संशोधन छात्र अनिरुद्ध मदने उपस्थित होते.