करोडोचा निधी हवेत, रस्ते खड्ड्यांत! — नागरिक त्रस्त, शेकापचा इशारा

रायगड : अलिबाग तालुक्यातील प्रमुख मार्गांचे आजचे चित्र धक्कादायक आहे — रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आणि आमदारांच्या केवळ गाजरगप्पा! अलिबाग-पेण, अलिबाग-तळेखार (साळाव मार्गे), अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड, वावे-रेवदंडा अशा महत्त्वाच्या मार्गांवर खड्ड्यांचा अक्षरशः स्फोट झाला असून, वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.
“कोट्यवधी रुपयांचा निधी आणला,” अशी मुठमाती ठोकणाऱ्या आमदारांना आता नागरिक विचारत आहेत — कोट्यवधीचा निधी कुठे गेला?, असा सवाल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. स्वतःच्या खर्चाने रस्ता बनवू असे आश्वासन देणारे आमदार आता खड्ड्यांकडे फिरकतही नाहीत. कुरूळ ते आरसीएफ कॉलनी, बेलवली खानाव ते उसर-वावे नाका अशा ठिकाणी रस्ते आहेत की खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे हे पाटील यांनी लक्ष वेधले.
रेवदंडा ते तळेखार मार्गावर रुंदीकरणाच्या नावाखाली पावसाळ्याआधी खोदकाम करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १७१ कोटी रुपये मंजूर असूनही साळाव ते तळेखार हा रस्ता चिखलात बुडालेला आहे, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला.
अलिबाग-मांडवा मार्गासाठी १८८ कोटी, तर अलिबाग-मुरूड रस्त्यासाठी १३० कोटी रुपये मंजूर आहेत. पण कामाचे ठेके दिल्यावर कंपन्या गायबच! कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड, तसेच अन्य मार्गांवरून प्रवास करताना अपघाताची शक्यता कायम आहे, असेही त्या म्हणाल्या.
अनेक वाहनचालक खड्डे चुकवतांना अपघातग्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे, पण प्रशासन गप्प! खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा थेट इशारा पाटील यांनी दिला आहे. निधी आहे तरी रस्ते का नाहीत? हा हिशोब नागरिक आता मागू लागले आहेत. आमदारांनी उत्तर द्यावं, नाहीतर आंदोलनाला तयार राहावं!
….