कढी-भातानंतर संकट! आश्रमशाळेतील १३ विद्यार्थिनींना विषबाधा

बुलढाणा : तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील १३ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या जेवणामध्ये कढी-भात खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढले आणि त्यांची प्रकृती बिघडली.
घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. यापैकी पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदर आश्रमशाळा भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मालकीची आहे. घटनेनंतर पालकांमध्ये चिंता आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
तपासणी आणि अन्ननमुन्यांची चाचणी अपेक्षित
सद्यस्थितीत, विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, अन्नाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.