क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
एमसीएच्या विश्वासाला रायगडची साथ; आंतरराष्ट्रीय पंच विनीत कुलकर्णी आणि अजय देशपांडे यांचा सत्कार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर वरिष्ठ गटाच्या दोन दिवसीय कसोटी स्वरूपातील क्रिकेट स्पर्धेतील १५ सामन्यांचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे.
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रायगड विरुद्ध सेंट्रल डिफेन्स अकॅडमी संघांमधील सामन्यासाठी पंच म्हणून एमसीएचे पहिले युवा आंतरराष्ट्रीय (आयसीसी व बीसीसीआय मान्यताप्राप्त) पंच विनीत कुलकर्णी तसेच महाराष्ट्र क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष अजय देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आरडीसीएच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
एमसीएच्या वतीने गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात विविध वयोगटांतील सुमारे ६० सामन्यांचे आयोजन करण्याची जबाबदारी आरडीसीएला देण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध मैदानांवर हे सामने यशस्वीरीत्या पार पडले आहेत.
सत्कारप्रसंगी बोलताना विनीत कुलकर्णी म्हणाले की, क्रिकेटचे खरे हिरो हे खेळाडूच असून पंच हे केवळ निरीक्षक व नियमांचे पालन करून निर्णय देणारी भूमिका पार पाडतात. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची गेल्या दोन वर्षांतील प्रगती उल्लेखनीय असून एमसीए इन्व्हिटेशन स्पर्धेतील ६० सामन्यांचे यशस्वी आयोजन हे त्याचे द्योतक आहे. तसेच एमसीए प्रमाणित पंच व गुणलेखकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
अजय देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार सामने व्हावेत ही आमची इच्छा आहे. भविष्यात क्रिकेटचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. एमसीएच्या महत्त्वाच्या सामन्यांचे आयोजन भविष्यात रायगडमध्ये होऊ शकते, त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची मैदाने व खेळपट्ट्या तयार करण्यावर भर द्यावा लागेल. तसेच आरडीसीएकडे स्वतःचे स्वतंत्र मैदान असावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात क्रिकेटचा विकास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उत्कृष्ट मैदान व खेळपट्टी उभारण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यात येईल. प्रत्येक वयोगटात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडून त्यांनी महाराष्ट्र व देशासाठी खेळावे, हा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सत्कार सोहळ्यास आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील, खजिनदार प्रशांत ओक, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे, देवेंद्र पाटील, श्याम पाटील, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, रणजीपटू योगेश पवार, दिनेश सावंत, दिलीप लाड, शेखर भगत, एमसीए पंच सुयोग चौधरी, चंद्रकांत चौधरी, ॲड. पंकज पंडित, रायगडचा कर्णधार रवी सोलंकी, सीडीए संघाचा कर्णधार विश्वजित जगदाळे यांच्यासह दोन्ही संघांचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




