ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

एकाच वेळी २२ ठिकाणी जलजागरणाची लाट! रायगडमध्ये ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’चा अनोखा संकल्प

“पाण्याचे रक्षण म्हणजे सृष्टीचे खरे संरक्षण”- सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

“पाण्याचे रक्षण म्हणजे सृष्टीचे खरे संरक्षण” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत उत्साहात पार पडला. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील २२ ठिकाणी नद्या, तलाव, विहिरी आणि समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. अलिबागजवळील भिलजी शाखेअंतर्गत रेवदंडा पारनाका समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला असून साधसंगत व सेवादल कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

खोपोली, सावरोली, मार्केवाडी, तिवरे, पेण, बोर्वे, रोहा, कोंडगाव, अलिबाग, पोयनाड, सारळ, भिलजी, खरसई, भरडखोल, श्रीवर्धन, वडवली, खरवली, कडापे, चोरवली, महाड, बिरवाडी आणि रावतळी या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. खरसई (रायगड) येथील झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १,६०० हून अधिक ठिकाणी सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला.

अभियानाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली असून संपूर्ण उपक्रमात सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच समाजमनात जागरूकतेचा संदेश पोहोचत आहे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा केवळ घोषवाक्य नसून भावी पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्य घडविण्याचा संकल्प असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले.


Related Articles

Back to top button