“इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प”
आळंदीतील भक्तनिवास व घाटाचे भूमिपूजन तसेच रुग्ण तपासणी केंद्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आळंदी : “इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी जे काही करावे लागेल ते आपण करणार आहोत. एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी, पीएमडीए, पर्यावरण विभाग सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प मार्गी लावायचा आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदीत केले. त्यांनी सांगितले की, “मी स्वतः पर्यावरण विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. इंद्रायणीला स्वच्छ, निर्मळ करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.”
आळंदीतील भक्तनिवास व घाटाचे भूमिपूजन तसेच रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,
उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, माजी आमदार रवींद्र धंगेकर, योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ महाराज, चैतन्य लोंढे महाराज, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. रोहिणी ताई पवार, पुरुषोत्तम पाटील, माधव खांडेकर, धर्मवीर अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, भगवान पोखरकर, मुख्याधिकारी खांडेकर, तसेच विविध संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “वारकरी संप्रदायाची महान परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव आहे. जे काही कार्य आपण करतो, त्यामागे संतांचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सुवर्णकलश आणि महाद्वार उद्घाटनाच्या वेळी आलेलो. आज पुन्हा माऊलींच्या सान्निध्यात येण्याचे भाग्य लाभले. आळंदीत आलो की घरी आल्यासारखे वाटते.”
ते पुढे म्हणाले, “इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आपण केला आहे. डीपीआरचे काम सुरू असून एमआयडीसी ते लवकर पूर्ण करेल. पूर्वी लोक इंद्रायणीत स्नान करायचे; तीच पवित्रता पुन्हा आणायची आहे.”
शिंदे यांनी सांगितले की, “ज्ञानपीठाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे आणि राज्य सरकार पूर्णपणे पाठिशी आहे. वारकरी संप्रदाय व आपले नाते हे जिव्हाळ्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.”
ते म्हणाले, “भक्तनिवासासाठी आवश्यक २५ कोटी रुपयांचा निधी मी तातडीने मंजूर केला. जीआर काढून तो विश्वस्तांच्या हाती दिला. माझे काम फास्ट आहे — नो रीजन, ऑन-द-स्पॉट डिसिजन हा माझा मंत्र आहे.”
राज्यातील विकासकामांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “महायुती सरकार धर्म, प्रथा, परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान राखणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संवर्धन सुरू आहे. आपल्या राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे अभिमानास्पद आहे.”
ते म्हणाले, “आरोग्य आणि अध्यात्म एकत्र नांदले पाहिजे. मुख्यमंत्री असताना आरोग्य योजनेतील उपचार मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली. वारकरी भवन राज्यातील बहुतांश तालुक्यांत उभारले जात आहेत. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले, “आळंदीला चार दिवसांतून एकदा पाणी मिळते. पाणीपुरवठा योजनेला तात्काळ तांत्रिक मान्यता द्यावी, लागणारा निधी मी देईन. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.” असे सांगितले.
ते म्हणाले, “शेतकरी आणि वारकरी या दोघांशी माझे नाते अंतर्मनाचे आहे. पांडुरंग आणि वारकरी संप्रदायाकडूनच मला ऊर्जा मिळते. अवघाची संसार सुखाचा करीन हा आमचा मंत्र आहे. महायुती सरकार प्रत्येकासाठी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”
शेवटी शिंदे म्हणाले, “वारी सुरू होण्याआधी या भागातील सर्व रस्ते चकाचक करण्यात येतील. नगरविकास विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा वेग असाच पुढे ठेवूया.” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
—




