आशिया कप : भारताचा पाकिस्तानसोबत सुपर-४ मध्ये सामना; वेळापत्रक स्पष्ट

मुंबई : आशिया कपमध्ये भारतीय संघ आता सुपर-४ फेरीत प्रवेश करत आहे. पुढील फेरी भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण याच कामगिरीवर संघाचे फायनलपर्यंतचे समीकरण अवलंबून आहे. चांगली कामगिरी झाल्यास भारताला थेट फायनल गाठता येईल, पण जर अपयश आले तर स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता वाढेल. भारताचे सुपर-४ मधील सामने आता जाहीर झाले आहेत.
सुपर-४ मधील भारताचा पहिला आणि सर्वात चर्चेचा सामना रविवारी दुबईत रंगणार आहे. हा सामना भारत व पाकिस्तान यांच्यात होईल. सामना सुरू होण्यापूर्वी टॉस संध्याकाळी ७.३० वाजता होणार असून, खेळाची सुरुवात रात्री ८ वाजता केली जाईल.
भारताचा दुसरा सामना २४ सप्टेंबर, बुधवारी खेळवला जाईल. हा सामना देखील दुबईच्या मैदानावरच होणार असून, प्रतिस्पर्धी संघ असेल बांगलादेश. बांगलादेश संघाने ‘ब’ गटातून दुसरे स्थान पटकावले होते.
सुपर-४ मधील तिसरा आणि निर्णायक सामना २६ सप्टेंबरला होणार आहे. या वेळी भारताचा सामना गटातील अव्वल संघाशी होईल. गट-स्टेजमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी समान गुण मिळवले होते. त्यामुळे हा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाण्याची शक्यता आहे. दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार असून, यामुळे स्पर्धेतील रंगत शिगेला पोहोचेल.
भारताने जर हे तिन्ही सामने जिंकले, तर त्यांना थेट फायनलमध्ये स्थान मिळेल. पण एक तरी पराभव झाला, तर फायनलची गणिते क्लिष्ट होऊ शकतात.




