“आपत्ती काळात वायरलेस यंत्रणा ठरते जीवनरेखा – रेवस ग्रामपंचायतीत मार्गदर्शन शिबिर”

अलिबाग: मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणाऱ्यांनी जसे बर्फ, पिण्याचे पाणी, जेवणाचे साहित्य, औषधे यांची काळजी घेतली पाहिजे, तशीच सर्वात महत्त्वाची असलेली वायरलेस यंत्रणा आणि त्यासोबतच्या दोन बॅटऱ्यांची खात्री करून घेणेही तितकेच गरजेचे आहे. कारण अचानक येणाऱ्या वादळामुळे बोट भरकटून कोकण किनाऱ्याच्या बाहेर गेल्यास भारतीय नौदल व पोलिसांच्या मदतीने आपण घरी परतू शकतो, पण चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेल्यास आयुष्य जेलमध्ये घालवावे लागू शकते, असा इशारा रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी दिला.
ग्रामपंचायत रेवस यांच्यावतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशासक प्रितेश पाटील, माजी सरपंच मच्छिंद्र पाटील, मुख्याध्यापक प्रवीण पाटील, ग्रामसेवक दिनेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविकात प्रशासक प्रितेश पाटील म्हणाले की, विविध प्रकारच्या आपत्ती प्रसंगी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत गावपातळीवर अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, याची माहिती आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर आरोग्य सेवांबाबत माहिती देताना डॉ. भक्ती पाटील यांनी 102 (बाळंतपणात वापरण्याची) आणि 108 (अपघात, सर्पदंश, इमर्जन्सी) रुग्णवाहिका सेवांचा योग्य वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सहाय्यक बर्वे आणि वाहनचालक स्वप्नील पाटील यांनी प्रत्यक्ष 102 रुग्णवाहिकेसह दाखल होऊन प्रात्यक्षिक सादर केले. ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तीला कशा पद्धतीने चादरीत किंवा हातावरून सुरक्षितरित्या हलवावे, याचे प्रात्यक्षिक डॉ. जयपाल पाटील यांनी दिले.
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने मांडवा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोमनाथ लांडे, हवालदार प्रदीप देशमुख आणि महिला पोलीस चंचल सुखेड यांनी 112 क्रमांकाचा वापर व त्याची गरज याबाबत माहिती दिली.
108 रुग्णवाहिका सेवांबाबत रायगड जिल्हा प्रमुख अजय जगताप यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉक्टर अजित (पेण), पायलट सिद्धांत म्हात्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशा सेविका रुपाली भगत, अंगणवाडी सेविका कुमुदिनी कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी प्रियांका म्हात्रे, मोनिका कडवे, मानसी पाटील, तनुजा पाटील, नरेश म्हात्रे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक मनोज राणे यांनी केले, तर आभार ग्रामसेवक दिनेश राणे यांनी मानले.