ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

आईच्या पावलावर पाऊल… अलिबागच्या इतिहासात भावुक सुवर्णक्षण! अक्षया नाईक नगराध्यक्षपदी विराजमान 

आईचा संघर्ष, वडिलांचे पाठबळ आणि मुलीचे स्वप्न… अलिबाग साक्षीदार ठरला इतिहासाच्या पुनरावृत्तीचा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : आईच्या साडीच्या पदराआड दडलेली आठवण, डोळ्यांत साठलेले अश्रू आणि चेहऱ्यावर जबाबदारीची गंभीर जाणीव…अलिबाग नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आज साक्षात इतिहास घडला. नगराध्यक्ष अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि पुढल्याच क्षणी टाळ्यांच्या गजरात भावनांचा पूर उसळला.
या समारंभाला सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, अधिकारी-कर्मचारी, अलिबाग शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र आजचा क्षण केवळ राजकीय नव्हता तो पिढ्यांतील वारसा, संघर्ष आणि कुटुंबीयांच्या त्यागाच्या आठवणींचा होता.
राज्यातील सर्वात कमी वयाची नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अक्षया नाईक यांनी या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. शेतकरी कामगार पक्षाने १७ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर शिवसेना (उबाठा)चे दोन आणि भाजपचा एक उमेदवार निवडून आला. शेकापक्ष आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती आणि निकालाने त्यावर ठळक शिक्कामोर्तब केले.
मात्र आजच्या दिवसाला खऱ्या अर्थाने भावनिक बनवले ते आई-मुलीच्या नात्याबरोबरच वडिलांच्या मूक योगदानाने.
२३ डिसेंबर २०११ रोजी अक्षयाची आई नमिता नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल १५ वर्षांनंतर, २६ डिसेंबर २०२६ रोजी अक्षयाने तोच पदभार स्वीकारताना आईने त्या दिवशी परिधान केलेली तीच साडी अंगावर घेतली. त्या क्षणी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. अक्षयामध्ये क्षणभर नमिता नाईक यांचीच छबी दिसत होती. पण त्या छबीमागे एक अदृश्य आधारस्तंभ उभा होता तो म्हणजे वडील प्रशांत नाईक यांचा.
राजकारणाच्या कठीण प्रवासात, पडद्यामागे उभे राहून कुटुंब सावरत, मुलीच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवत, तिला घडवणारे प्रशांत नाईक आज फारसे बोलले नाहीत…
पण त्यांच्या डोळ्यांतला अभिमान सर्व काही सांगून गेला.
आज अक्षया ज्या खुर्चीवर बसली, त्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी आईच्या संघर्षाइतकेच वडिलांचे संयम, त्याग आणि मार्गदर्शन कारणीभूत ठरले.
ही केवळ सत्ता हस्तांतरणाची कथा नाही; ही आहे आईच्या संघर्षाची, वडिलांच्या पाठबळाची, मुलीच्या स्वप्नांची आणि अलिबागच्या लोकांच्या विश्वासाची. आज अलिबागने एक नगराध्यक्ष निवडली नाही तर आपल्या इतिहासात एक भावनिक, कुटुंबीयांच्या त्यागाने उजळलेला अध्याय कोरला आहे.

Related Articles

Back to top button