ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

आंबेनळी घाट मार्ग पुन्हा सुरु; पर्यटन, नागरिक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : आंबेनळी घाट मार्गावर अखेर वाहतूक सुरु झाली असली तरी या निर्णयामागे प्रशासनाची सावधगिरी, स्थानिकांची सहनशीलता आणि पर्यटनाच्या अर्थकारणाचा दबाव या तिन्ही बाजू स्पष्टपणे दिसून येतात.
महिनेन्‌महिने हा घाट बंद होता. महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करून वेळ, पैसा आणि जीव दोन्ही धोक्यात घालावा लागत होता. आपत्कालीन रुग्णवाहिका असो वा विद्यार्थ्यांची दैनंदिन ये-जा – सर्वांनाच प्रचंड त्रास. त्या काळात प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित पर्याय दिला का? नाही!
आता मात्र घाट सुधारला म्हणून परवानगी. सुधारणा खरंच पुरेशी झाली आहे का? कारण आदेशातच स्पष्ट नमूद आहे – “अतिवृष्टीच्या दिवसांत घाट पुन्हा बंद राहील.” म्हणजे घाट कितीही दुरुस्त केला तरी धोका अजून टळलेला नाही. मग नागरिकांचा जीव धोक्यात घालून वाहतूक सुरु करण्यामागे नेमकी प्रेरणा कोणती?
पर्यटन हाच मुख्य मुद्दा! महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांशिवाय स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. हॉटेल्स, गाईड्स, ट्रान्सपोर्टर्स यांची लॉबी सतत दडपण आणत होती. अखेर त्यांचा आवाज प्रशासनाने ऐकला. नागरिकांच्या आक्रोशापेक्षा पर्यटकांच्या पैशाला जास्त महत्त्व दिले गेले, असेच चित्र आहे.
एकीकडे सुरक्षिततेचे धोरण, दुसरीकडे पर्यटनाचा दबाव – यामध्ये नेहमीप्रमाणे मार खातो तो सर्वसामान्य माणूस.

Related Articles

Back to top button