अलिबाग-रोहा मार्गावरील साकव कोसळल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा — राकेश पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबाग–रोहा रस्त्यावरील वढाव गावाजवळील साकव अचानक कोसळल्याच्या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार दाखल केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
अलिबाग–रोहा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनला असून, प्रत्येक खड्ड्यात मृत्यू लपलेला असल्याची भीती प्रवाशांना वाटते. जुलै 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रस्ते दुरुस्तीअभावी अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असे निर्देश दिले होते. त्याच बैठकीचा आधार घेत सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी वढाव येथे साकव कोसळून स्वप्निल रामचंद्र गायकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलेचा जीव थोडक्यात वाचला असून, सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, साकव वाहतुकीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. अलिबाग–रोहा मार्गावर 5 टनांपेक्षा जास्त वजनाची गेल कंपनीची अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर धावतात, त्यामुळे साकव व रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
मागण्या :
संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत
साकवाचे युद्धपातळीवर पुनर्बांधकाम करावे व वाहतूक सुरळीत करावी
ही तक्रार आज जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे देण्यात आली.




