ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागची एनर्जी क्वीन अमेरिकेत दोन पुरस्कारांनी सन्मानित

शिवानी साईकर-वझे हिची ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात चमकदार कामगिरी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग : येथील थळ गावची मुलगी शिवानी साईकर-वझे हिने ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात चमकदार छाप पाडत अमेरिकेत एक नव्हे तर दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून अलिबागची मान अभिमानाने उंचावली आहे. मूलकण संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या फर्मी नॅशनल अॅक्सेलरेटर लॅबोरेटरी (Fermilab) मध्ये ऊर्जा व्यवस्थापक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत असलेल्या शिवानीच्या नाविन्यपूर्ण कामगिरीची अमेरिकेत सर्वत्र दखल घेतली जात आहे.
दोन आंतरराष्ट्रीय सन्मानांचा मान
ऊर्जा कार्यक्षमतेसाठी केलेल्या सुधारणा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाश्वत ऊर्जा उपक्रम यांच्या प्रशंसापूर्ण कार्यासाठी तिचा ‘एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर 2025 – मिडवेस्ट यूएस’ या मानाच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार असोशिएशन ऑफ एनर्जी इंजिनियर्स (AEE) तर्फे १७ सप्टेंबर रोजी अटलांटामधील जॉर्जिया वर्ल्ड काँग्रेस सेंटर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यासोबतच, ऊर्जा व शाश्वत प्रयोगशाळा व्यवस्थापन क्षेत्रात उदयोन्मुख नेतृत्व म्हणून तिची निवड होऊन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लॅबोरेटरीज संस्थेने तिला ‘फिल विर्डझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स 2025’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा दुसरा पुरस्कारही दिला आहे.
शैक्षणिक वाटचाल
अलिबागजवळील थळगाव येथील रहिवासी असलेल्या शिवानीने आरसीएफ शाळेतून शिक्षण घेतले. शालेय जीवनापासूनच तिची जिज्ञासा आणि तांत्रिक विषयांतील प्राविण्य स्पष्ट दिसत होते. पुढे तिने मुंबईतील सुप्रसिद्ध VJTI महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीत प्रवेश घेत ऊर्जा व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विषयात मास्टर्स पूर्ण केले.
कारकीर्द आणि प्रगती
डेनवरमधील एका खासगी कंपनीत काही काळ उमेदवारी करताना तिने ऊर्जा कार्यक्षमतेवरील प्रकल्पांवर काम केले. तिच्या मेहनती, दृष्टीकोन आणि कौशल्यामुळे पुढे शिकागो येथील जगप्रसिद्ध Fermilab मध्ये ऊर्जा व्यवस्थापक (Energy Manager) पदासाठी तिची निवड झाली. येथे ती मोठ्या प्रयोगशाळांमधील ऊर्जा वापर कमी करण्यासाठी नव्या योजना, तांत्रिक सुधारणा, सस्टेनेबल पद्धती आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रम राबवते. तिच्या नेतृत्वाखाली फर्मिलॅबमध्ये ऊर्जा खर्च कमी करण्यासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांना नवीन गती मिळाली. शिवानीच्या कामामुळे प्रयोगशाळेचे ‘ग्रीन अॅप्रोच’ मजबूत झाला आहे.
वैयक्तिक आयुष्य
बॉस्टनमध्ये शिक्षणादरम्यान अलिबागच्याच मैत्रेय वझे यांच्याशी तिची ओळख झाली. पुढे ही ओळख प्रेमात परिवर्तित होऊन दोघांचा विवाह अमेरिकेत पार पडला. या विवाहाचे पौरोहित्य अलिबागमधील सुप्रसिद्ध डॉक्टर दांपत्य डॉ. रेणुका (रीटा) धामणकर आणि डॉ. राजीव धामणकर यांनी दूरस्थ पद्धतीने करून दिले, हीदेखील एक विशेष आठवण म्हणून आजही दोघांच्या मनात आहे.
संशोधनालाही मान
ऊर्जा संवर्धनासंदर्भात शिवानीने केलेल्या संशोधनाचा लेख ऊर्जा विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. तिच्या संशोधनातून विविध प्रयोगशाळा आणि औद्योगिक क्षेत्रांना ऊर्जा वापरात टिकाऊ व किफायतशीर बदल घडवण्यासाठी उपयोजना सुचवण्यात आल्या आहेत.
कृतज्ञतापूर्वक उल्लेख
शिवानी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना, आरसीएफ शाळेला, VJTI महाविद्यालयाला तसेच अलिबागमधील दादा वारीसे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला देते. तिच्या मते, गावातून सुरू झालेला तिचा प्रवास आज अमेरिका गाठू शकला, त्यामागे अनेकांचा मोलाचा वाटा आहे.
शिवानी वझेची कामगिरी ही केवळ एका तरुणीची यशोगाथा नसून अलिबाग, रायगड आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.

Related Articles

Back to top button