अमेरिका–व्हेनेझुएला संघर्ष पेटला! कराकसवर एअर स्ट्राईक, मादुरोंबाबत ट्रम्प यांचा धक्कादायक दावा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल डेस्क टीम
जग हादरवणाऱ्या घडामोडीत अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आज पहाटे अमेरिकन लष्कराने थेट कराकस या व्हेनेझुएलाच्या राजधानीवर जोरदार हवाई हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यानंतर काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत धक्कादायक दावा केला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्याने ताब्यात घेत देशाबाहेर काढले आहे. या दाव्यामुळे जागतिक राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, व्हेनेझुएलाच्या सरकारने अमेरिकेवर गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. “हा हल्ला लोकशाहीसाठी नसून आमच्या देशातील तेलसंपत्ती आणि खनिज संसाधनांवर कब्जा करण्याचा कट आहे,” असा संतप्त आरोप व्हेनेझुएलाने केला आहे. अमेरिकेची ही कारवाई सरळसरळ साम्राज्यवादी मानसिकतेतून केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर रशिया आक्रमक भूमिकेत आला आहे. रशियाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत तो अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितलं की,“ व्हेनेझुएलाच्या जनतेला कोणत्याही बाह्य लष्करी हस्तक्षेपाशिवाय स्वतःचं भविष्य ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. अमेरिकेची सशस्त्र कारवाई ही निषेधार्ह आहे. लॅटिन अमेरिका शांततेचा प्रदेश राहिला पाहिजे.”
रशियाने व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं असून संवाद आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे.
या घडामोडींवर जर्मनीनेही तातडीची प्रतिक्रिया दिली आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, व्हेनेझुएलातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून कराकसमधील जर्मन दूतावासाशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. संकटकाळात आवश्यक ती पावलं उचलण्याची तयारी जर्मनीने दर्शवली आहे.
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव काही आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी वारंवार व्हेनेझुएलावर अमेरिकेत ड्रग्ज तस्करी होत असल्याचे आरोप केले आहेत. मात्र, मादुरो यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावत अमेरिकेवर खोटे आरोप लावल्याचा पलटवार केला आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कडक आर्थिक निर्बंध लादले. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर व्हेनेझुएलाने अमेरिकेवर वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करत तीव्र टीका केली होती.आजचे हवाई हल्ले हे त्या इशाऱ्याचं थेट आणि आक्रमक रूप मानले जात आहेत.




